पीटीआय, नवी दिल्ली

“खटला न चालवता तुरुंगात ठेवणे ही शिक्षाच आहे,” असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका कैद्याला जामीन मंजूर केला. या कैद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही अद्याप खटला सुरू न झाल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

प्रदीप कुमार उर्फ बानू असे या कैद्याचे नाव असून त्याच्यावर फेब्रुवारी २०२४मध्ये खुनाचा प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण २३ साक्षीदारांची नावे असून, अद्याप एकाही साक्षीदाराची तपासणी झालेली नाही असे न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. पी. व्ही. वराळे यांच्या खंडपीठाने बानूला जामीन मंजूर करण्याच्या आदेशात नमूद केले. यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ११ जुलै ०२५ रोजी बानूला जामीन नामंजूर केला होता. तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

“अर्जदाराविरोधातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी फिर्यादी पक्षाने २३ साक्षीदारांची तपासणी करणार असल्याचे सांगितले, पण आतापर्यंत एकाचीही तपासणी करण्यात आली नाही. यामुळे या खटल्याचा निकाल लागायला काही वेळ लागेल,” असे न्यायाधीशांनी १३ मार्चच्या आदेशात नमूद केले. बानूला अटक होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत, आतापर्यंत खटला सुरू झालेला नाही आणि त्यामुळे खटल्याचा निकाल कुठेही दृष्टिपथात नाही याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.