पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ मध्ये निवडणूक आयोगाने केलेले बदल सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय केल्याचे समोर आले आहे. यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी “अशा कोणत्याही बदलाला आम्ही मान्यता दिलेली नाही. निवडणूक आयोगाचा अहवाल आल्यानंतर कोणी आणि काय फेरफार केले, याची सखोल चौकशी करू,” अशी टिप्पणी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना हे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
नेमका वाद काय?
मतदारयादीतील नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने आपल्या ‘ECINET’ ऑनलाइन पोर्टलवर ‘फॉर्म ६’चा डिजिटल प्रकार उपलब्ध करून दिला होता. यामध्ये कायदेशीर मंजुरी नसताना एका नवीन रकान्याचा समावेश करण्यात आला. या नवीन रकान्यात अर्जदाराच्या पालकांची मतदारयादीतील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) संदर्भातील माहिती द्यावी लागत होती.
कायद्यानुसार मूळ ‘फॉर्म ६’ मध्ये कोणताही अधिकृत बदल झालेला नसताना, ऑनलाइन पोर्टलवर या नव्या अटीचा रकाना जोडून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
न्यायालयात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा संदर्भ
ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीचा संदर्भ देत न्यायालयात बाजू मांडली. “दिल्लीतील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान ‘फॉर्म ६’ मध्ये दोन नवीन अटी जोडल्या गेल्या आणि तेच फॉर्म वितरीत करण्यात आले. या नव्या फॉर्मच्या आधारे नागरिकांना नोटीसही बजावण्यात आल्या,” असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले:
“आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, सुधारित ‘फॉर्म ६’ला सर्वोच्च न्यायालयाची कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. निवडणूक आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यावर, कोणी काय बदल केले हे आम्ही सविस्तर तपासू.”
मुख्य निवडणूक आयुक्तांवर वैयक्तिक गुन्हेगारीचा आरोप
अॅडव्होकेट शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जुलै २०२६ मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने नियम डावलून ECINET पोर्टलवर हा बदल केला. १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवडणूक आयुक्त संधू यांनी हा बदल “अनाधिकृत आणि बेकायदेशीर” असल्याचे सांगत तो तात्काळ हटवण्याचे आदेश दिले होते. तरीही हा फॉर्म पोर्टलवर सुरूच ठेवण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्तांचे हे कृत्य त्यांच्या अधिकृत कर्तव्याच्या कक्षेत येत नाही, असा दावा करत याचिकेत त्यांच्यावर वैयक्तिक गुन्हेगारी उत्तरदायित्वाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या वादानंतर निवडणूक आयोगाने ज्या राज्यांमध्ये ‘SIR’ प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथून ही नवीन अट हटवली असून केवळ नियम १९६० नुसारच वैधानिक फॉर्म वापरले जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्याने आता निवडणूक आयोगाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
