‘यंत्रणेवर हल्ला करणाऱ्यां’बाबत केलेल्या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर सुरू झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या उपरोधिक मोहिमेवर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. “या विषयाकडे इतके भावूक होऊन पाहू नका,” असा सल्ला सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका वकिलाला दिला आहे. सरन्यायाधीशांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून न्यायालयाची नाहक बदनामी केली जात असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
१५ मे रोजी एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयीन यंत्रणेवर चिखलफेक करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. दिल्ली उच्च न्यायालयातील ‘वरिष्ठ अधिवक्ता’ पदाच्या निकषांना आव्हान देणाऱ्या एका वकिलाची कानउघाडणी करताना सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले होते.
या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले होते की,
“समाजात असे काही परजीवी आहेत जे सातत्याने व्यवस्थेवर हल्ले करत असतात. तुम्हाला त्यांच्याच पंगतीला जाऊन बसायचे आहे का? काही तरुण हे ‘कॉक्रोच’सारखे (झुरळ) असतात, ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात किंवा इतर कुठेही काम मिळत नाही. मग असे लोक पत्रकारिता, सोशल मीडिया किंवा आरटीआय (RTI) कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवरच चिखलफेक करू लागतात.”
सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची चर्चा
सरन्यायाधीशांच्या या ‘कॉक्रोच’ शब्दाचा धागा पकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि सध्या अमेरिकेत राहणारे ३० वर्षीय अभिजित दिपके यांनी या वक्तव्याचा उपरोधिक निषेध म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाचे एक डिजिटल व्यासपीठ सुरू केले. पाहता पाहता ही मोहीम इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली.
केंद्र सरकारची मोठी कारवाई
दरम्यान, या मोहिमेची दखल घेत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे ‘X’ (ट्विटर) खाते भारतात ब्लॉक केले आहे. गुप्तचर विभागाने (IB) या खात्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईनंतर अभिजित दिपके यांनी लागलीच ‘कॉक्रोच इज बॅक’ नावाचे नवीन खाते सुरू करत युजर्सना त्यावर जोडण्याचे आवाहन केले आहे.
…आणि सरन्यायाधीशांनी दिली होती स्पष्टोक्ती
या संपूर्ण वादावर सरन्यायाधीशांनी न्यायालयात आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. “मी देशातील तरुणांवर टीका केली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे, मी केवळ अशा लोकांवर टीका केली होती, जे बनावट आणि बोगस पदव्यांच्या जोरावर वकिली किंवा इतर प्रतिष्ठित क्षेत्रांत घुसले आहेत, अशाच प्रवृत्तीचे लोक पत्रकारिता, सोशल मीडिया आणि इतर पवित्र क्षेत्रांमध्येही घुसले असून ते समाजासाठी परजीवी ठरत आहेत, मला माझ्या देशातील तरुण पिढीचा सार्थ अभिमान आहे आणि भारतातील प्रत्येक तरुण माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे.” असे सरन्यायाधीश म्हणाले होते.
“इतके भावूक होऊ नका”
सरन्यायाधीशांच्या या स्पष्टीकरणानंतरही समाजमाध्यमांवर न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत एका वकिलाने याचिका दाखल केली होती. न्यायालयीन कामकाजातील संवादाचा व्यावसायिक किंवा राजकीय गैरवापर रोखण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यावर आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संबंधित वकिलाला शांत राहण्याचा सल्ला दिला. “या विषयाला वैयक्तिक किंवा भावूक पातळीवर घेऊ नका,” असे सांगत न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला असून, योग्य वेळी यावर नियमित सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
