पीटीआय, नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल निलंबित भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ताशेरे ओढल्यानंतर विरोधकांनीही केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले. देशात द्वेषाचे वातावरण भडकावण्यास सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) जबाबदार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

गेल्या आठवडय़ात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी कलपेट्टा (केरळ) येथे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याची पाहणी केल्यानंतर राहुल म्हणाले, की सत्ताधारी पक्ष भाजपची मान शरमेने झुकली पाहिजे, केंद्रातील ‘एनडीए’ सरकारने ही परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. हे द्वेषमूलक वातावरण पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केले. देशात निर्माण केलेले हे वातावरण देशविरोधी कारवायाच आहेत. हे देशाच्या हिताविरुद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे फूट पाडणाऱ्या विचारसरणीविरुद्ध लढण्याचा काँग्रेसचा संकल्प अधिक बळकट झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निरीक्षणे नोंदवली आहेत. देशातील भावना भडकावण्यास भाजपच्या प्रवक्त्या एकटय़ा जबाबदार असून, त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागण्याचे न्यायालयाचे निर्देश योग्यच आहेत.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ‘ट्विट’मध्ये म्हटले, की, नूपुर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी आशा आम्हाला वाटते. पण शर्मा आणि त्यांच्यासारख्यांवर कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई केली नाही, तर चुकीचा संदेश जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या द्वेषनिर्मितीतून व वाहिन्यांवरील कडवट वादविवादातून हे फोफावत असल्याचे आढळेल.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विश्वम यांनी ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे, की नूपुर शर्मासाठी लाल गालिचा आणि तिस्ता आणि श्रीकुमारसाठी कारागृह!

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नूपुर शर्मा यांच्यावर कारवाई करू नये, यासाठी केंद्र सरकार दिल्ली पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना कायद्यानुसार कारवाई होऊ देण्याची विनंतीही केली.