Delhi Metro Closure Supreme Court hearing : एसआयआर प्रक्रियेतील गैरकारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून दिल्ली पोलिसांनी दिल्ली रेल्वे आणि दिल्ली मेट्रोही काही तासांकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून सर्वोच्च न्यायालायने ताशेरे ओढले. तसंच माशी मारण्याकरता हातोड्याचा वापर करणार का? असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.

दिल्ली मेट्रोची ५७ स्थानके बंद करण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. तसंच, नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्रत्येकाकडे कार नसते

न्यायालयाने म्हटलं आहे की, “मेट्रो स्थानकांचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करण्याबाबत आम्हाला मुख्यत्वे चिंता आहे; याबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत. तसेच, नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने योग्य पावले उचला. प्रत्येकाकडे कार नसते. प्रत्येकाला खासगी वाहनांची सोय उपलब्ध नसते. लोक सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. असं केलं जाऊ शकत नाही”, असं न्यायाधीश म्हणाले. न्यायालयाच्या चिंतेचं स्पष्टीकरण देताना सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, हा मुद्दा आंदोलकांबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल नाही, तर आपल्या उपजीविकेसाठी दिल्लीत प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे.

आम्ही शहरातील नागरिकांच्या वतीने बोलतोय

त्यांनी गुरुग्राम, ग्रेटर नोएडा, पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्ली येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टांवर प्रकाश टाकला. कारण यातील बहुतांश लोक रोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना उपाययोजना करण्याचा अधिकार आहे हे मान्य करत ते म्हणाले, “आम्ही या शहरातील सामान्य नागरिकांच्या वतीने बोलत आहोत.”

परंतु, त्यांनी यावर भर दिला की अनियंत्रित हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने लादलेल्या निर्बंधांमुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होऊ नये. “तुम्हाला अनियंत्रित हालचालींवर निर्बंध घालायचे असतील, तर तुम्ही ते करू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही ठप्प करून लोकांना कोणत्याही वाहतूक सुविधेशिवाय सोडून द्याल”, असं ते म्हणाले.

प्रत्येकाला खाजगी वाहनांची सोय नसल्याचं स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी सांगितलं की, मेट्रो स्थानकांचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या दैनंदिन प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितलं की, प्रशासनाने हे सुनिश्चित केलं पाहिजे की प्रतिबंधात्मक उपाय हे परिस्थितीच्या प्रमाणात असावेत. “तुम्हाला काही गोष्टींना प्रतिबंध करायचा आहे. त्यांना रोखण्यासाठी आवश्यक असेल तितक्याच मर्यादेपर्यंत उपाययोजना करा. परंतु याचा अर्थ असा नाही की माशी मारण्यासाठी तुम्ही हातोड्याचा वापर करावा. हे तत्त्व नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

शनिवारी जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव राजीव चौक, नवी दिल्ली, केंद्रीय सचिवालय, पटेल चौक आणि काश्मिरी गेट यांसह ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि एक्झिट गेट शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील सूचनेपर्यंत बंद राहतील, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने जाहीर केले. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शुक्रवारी ही बंदी जाहीर केली आणि सांगितले की हे निर्बंध १० ऑक्टोबर रोजीही सुरू राहतील, परंतु नवी दिल्ली मेट्रो स्थानक वगळता इतर सर्व बाधित स्थानकांवर इंटरचेंज (गाडी बदलण्याची) सुविधा उपलब्ध राहील.