Supreme Court Delhi Metro Order restrictions : एसआयआर प्रक्रियेतील गैरकारभार समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने शनिवार, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारले. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, देशभरातून नागरिक दिल्लीत येणार असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आणि सरकारने दिल्ली मेट्रो आणि रेल्वेसेवा खंडित केली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच, या सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, बेकायदेशीरपणे ताब्यात न घेण्याचेही आदेश दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सार्वजनिक वाहतूक सुरळीत करा
न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि न्यायाधीश व्ही. मोहाना यांच्या पीठाने निर्देश दिले की, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू राहाव्यात. कायद्यानुसार इंटरनेट सेवा खंडित केली जाऊ नये.” कायदेशीर निर्बंध आणि वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन लोकांना आणि वाहतुकीला मुक्तपणे फिरण्याची परवानगी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
आंदोलनादरम्यान वाहतूक सेवांवरील निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने केंद्रीय गृहसचिव, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) यांना अवमान कारवाईची नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आणि आजूबाजूला कलम १६३ चे निर्बंध लागू केल्याची घोषणा करणाऱ्या नोटिसा अद्याप हटवल्या नसतील, तर त्या हटवण्याचे निर्देशही न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले. वकिलांना त्यांच्या व्यावसायिक कर्तव्यांचे पालन करण्यापासून रोखले जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले.
शनिवारच्या आंदोलनादरम्यान राजकीय नेते, वकील, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना कथितपणे ताब्यात घेण्यासह पोलिसांच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकांवर रविवारी ही विशेष सुनावणी झाली. या याचिकांमध्ये वकिलांवर आणि माध्यमकर्मींवर झालेले हल्ले, इंटरनेट सेवांवरील निर्बंध आणि ४५ मेट्रो स्थानके बंद केल्याचाही दावा करण्यात आला.
वाहतुकीवरील निर्बंधांवर न्यायालयाचे प्रश्न
सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन बॅरिकेड्स लावण्याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कोणती स्थानके बंद करण्यात आली होती आणि कोणती सुरू होती, हे दर्शवणारा नकाशाही न्यायालयाने मागवला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं की, शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत सर्व मेट्रो स्थानके पुन्हा सुरू करण्यात आली होती आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. सार्वजनिक सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी निर्बंध आवश्यक असल्याशिवाय मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या पाहिजेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकांमध्ये बेकायदेशीर अटक आणि पोलिसांच्या अरेरावीचे आरोप
न्यायालयासमोर सादर केलेल्या अनेक याचिकांमध्ये पोलिसांच्या निर्बंधांच्या कायदेशीरतेवर आणि मर्यादेवर चिंता व्यक्त करण्यात आली. दिल्लीत येणाऱ्या मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याचा आरोप एका याचिकेत करण्यात आला होता. इतर याचिकाकर्त्यांनी राजकीय नेते आणि वकिलांना कथितपणे प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याला आणि वकील व माध्यमकर्मींवर केलेल्या बळाच्या वापराला आव्हान दिले.
न्यायाधीशांनी म्हटलं की, बेकायदेशीर अटक, अत्याधिक बळाचा वापर आणि वैधानिक कर्तव्यांचं उल्लंघन या आरोपांवर सरकारला उत्तर द्यावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराबाहेर कलम १६३ चे निर्बंध लागू करण्यावर आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांना पुरेशी माहिती दिली गेली होती का, यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणांवर मंगळवारी पुढील सुनावणी होईल, जेव्हा सरकार या आरोपांना उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.
