दिवाळीचा सण प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एका महत्त्वाच्या पर्यायाकडं लक्ष वेधलं आहे. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश देण्यासाठी क्रिकेटपटू विराट कोहली किंवा इतर लोकप्रिय क्रीडापटू, तसेच विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ‘लाइव्ह लॉ’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर दिल्ली आणि लगतच्या परिसरातील वायू प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले की, फटाक्यांवरील निर्बंधांची माहिती दूरदर्शन, वर्तमानपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात यावी.

दिग्गजांचा प्रभाव आणि जागृती

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती वराळे म्हणाले, “जनजागृती करण्यासाठी तुम्ही खेळाडू किंवा इतर क्षेत्रांतील असलेल्या नामवंत व्यक्तींचे सहकार्य का घेत नाही?”

यावर न्यायमूर्ती सुंदरेश पुढे म्हणाले, “दिल्लीसाठी जर तुम्ही विराट कोहलीसारख्या लोकप्रिय क्रिकेटपटूंना विनंती केली, तर ते नक्कीच मदतीसाठी पुढे येतील. ‘या वर्षीची दिवाळी सर्वांसाठी खरोखरच आनंददायी बनवूया, दिव्यांच्या या सणाचा खरा उत्साह अनुभवूया’ असा संदेश देणारी मोहीम त्यांच्याद्वारे राबवता येऊ शकते. मुळात दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकात दारूगोळा आणि फटाके आल्यानंतर या समस्या निर्माण झाल्या आहेत.”

न्यायालयाने स्पष्ट केले की, सण अशा प्रकारे साजरा केला पाहिजे जेणेकरून इतरांना, विशेषतः लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती, दिव्यांग नागरिक, तसेच पशूपक्षी आणि निसर्गाला कोणताही त्रास होणार नाही.

बालकांमध्ये संस्कार आणि जनजागृती

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी शाळकरी मुलांना सोबत घेणे अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला. यासंदर्भात शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्याची गरज असल्याचे न्यायमूर्ती सुंदरेश यांनी नमूद केले.

“आजची नवी पिढी अधिक संवेदनशील आहे. जर आपण लहान मुलांना प्रदूषणाचे धोके व्यवस्थित समजावून सांगितले, तर ते स्वतःहून आपल्या पालकांना फटाके न वाजवण्याचा आग्रह करतील. तरुण पिढीला सण साजरा करायचा आहे, पण त्यांचा फटाके वाजवण्यावर विश्वास नाही. याचा समाजावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक आरोग्य

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, दिवाळीशी जोडलेल्या भावनांचा आदर आहेच; परंतु सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांनाही तितकेच प्राधान्य दिले पाहिजे. घटनेचे ‘कलम २५’ नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य देते, परंतु हे स्वातंत्र्य सार्वजनिक आरोग्य आणि इतर मूलभूत हक्कांच्या चौकटीतच येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सध्याच्या टप्प्यावर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची न्यायालयाची इच्छा नाही, कारण अशा कठोर निर्णयाचे उलटे परिणाम (काळाबाजार किंवा बेकायदेशीर विक्री) होऊ शकतात. मात्र, न्यायालयाने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर दिलेल्या निर्देशांचे योग्य पालन झाले नाही, तर न्यायालयाला अधिक कठोर भूमिका घ्यावी लागेल.