Supreme Court Delhi Protest judgment : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि इतरांकडून एका याचिकेवर उत्तर मागवले आहे. व्यापारी संघटनांनी दाखल केलेल्या या याचिकेत सणासुदीच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेली निदर्शने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, यावर भर देतानाच न्यायालयाने म्हटलं की, कोणत्याही नियुक्त आंदोलन स्थळावर अनिश्चित काळासाठी ताबा मिळवला जाऊ शकत नाही.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आंदोलनांशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी सुरू होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली अटक, पोलिसांची अरेरावी, मेट्रो स्थानके अनियंत्रितपणे बंद करणे आणि इंटरनेट सेवा खंडित करणे यासारख्या आरोपांचा समावेश होता. ‘किराणा कमिटी दिल्ली’ने दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, रामलीला मैदानावरील आंदोलनांमुळे आसपासच्या परिसरातील व्यावसायिक उपक्रमांवर मोठा परिणाम झाला आहे.

व्यापारी संघटनांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं की, आंदोलन स्थळाच्या आसपासच्या भागात जवळपास ५० लाख लोक राहतात आणि दुकाने बंद राहिल्यामुळे सणासुदीच्या काळात व्यवसायावर परिणाम होत आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करत असल्याने यावर काहीतरी वेगळा आणि व्यावहारिक तोडगा शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

या युक्तिवादावर उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “तुम्ही एखाद्या जागेवर कायमस्वरूपी ताबा मिळवू शकत नाही. शेतकरी, पत्रकार आदी कुठे जाणार? प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी एक ठराविक वेळ आणि ठराविक कालावधी निश्चित केला पाहिजे.” खंडपीठाने व्यापारी संघटनांना या आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या सर्व संघटनांनाही या खटल्यात पक्षकार बनवण्यास सांगितलं, कारण त्यांच्या बाजू ऐकल्याशिवाय न्यायालय यावर निर्णय घेऊ शकत नाही. ज्येष्ठ वकील रोहतगी यांनी संबंधित संघटनांना पक्षकार बनवण्याचं मान्य केलं.

आंदोलनाशी संबंधित इतर मुद्द्यांवरही न्यायालयात सुनावणी

खंडपीठासमोर आंदोलकांसाठी करण्यात आलेली मोठ्या प्रमाणावर अटक, आंदोलकांवरील पोलिसांची कारवाई, मेट्रो स्थानके बंद करणे आणि इंटरनेट बंदी याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकांवरही सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की, आंदोलनाचा अधिकार आणि इतर नागरिकांचं हित या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावल्या असून, या सर्व याचिकांवरील सुनावणी अजूनही सुरू आहे.