नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना निर्बंध लागू करण्याचा अधिकार असला तरी, त्यासाठी संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था ठप्प करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी घेतली. ‘सीजेपी’ आणि इतर संघटनांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेगाड्या बंद करण्याचे, तसेच दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानके शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी झाली. माशी मारायला हातोडा कशाला, अशी टिप्पणी न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) व विद्यार्थी संघटनांच्या शनिवारी होणारे आंदोलन रोखण्याच्या दिल्ली पोलीस व केंद्रीय प्रशासन सर्व ते प्रयत्न करत आहे. मात्र, सर्व वाहतूक व्यवस्था बंद करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले. विशेषतः दिल्लीतील मेट्रोसेवा बंद करण्याच्या निर्णयावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

“सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवावी. वाहतूक नियमन आणि संपूर्ण बंदी यात फरक आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन नसते. सार्वजनिक वाहतूक बंद करून नागरिकांना अडचणीत टाकता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने घेतली. दिल्लीच्या कोणत्या भागात प्रत्यक्ष सुरक्षेचा धोका आहे व कोणत्या भागात वाहतूक सुरू ठेवता येऊ शकते, याचे स्वतंत्र मूल्यांकन करावे. संवेदनशील भागांत निर्बंध ठेवले तरी संपूर्ण शहरातील वाहतूक ठप्प होणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

आंदोलनाच्या हक्काला संरक्षण

शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. मात्र, आंदोलनासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परवानगी दिली नसेल तर त्यासंदर्भात न्यायालयीन मार्गही उपलब्ध आहे. परवानगी नसली तरी लोकांना आंदोलनाचा अधिकारच नाही असे न्यायालय म्हणत नाही; मात्र कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पर्यायी जागेचा विचार?

जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी दिली जात नसल्याच्या मुद्द्यावर, पर्यायी जागेचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली. शांततापूर्ण आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देताना तेथे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत सोयी असाव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही तुमची (पोलिसांची) जबाबदारी आहे. पण त्यामध्ये केवळ सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे अभिप्रेत नाही, त्यात जनतेचेही संरक्षण केले पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे. – सर्वोच्च न्यायालय