नवी दिल्ली : ‘‘शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणार्या आंदोलकांना बेकायदा ताब्यात घेऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली मेट्रो व इंटरनेट सेवा सुरळीत ठेवा,’’ असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रविवारी दिले.
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) तसेच विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर रविवारी न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर विशेष सुनावणी घेण्यात आली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती आणि ७००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली मेट्रोची सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार चालेल आणि इंटरनेट सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, हे निश्चित करावे, असे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांना सांगितले.
वकील, पत्रकार आणि इतर व्यक्तींना त्यांची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखले जाणार नाही, हेही सुनिश्चित करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मेहता यांना दिले. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर आणि हालचालींवर घातलेले निर्बंध हे संविधानाच्या अनुच्छेद १९(२) अन्वये नमूद केलेल्या अटींचे पालन करणारे असावेत. कायद्याने विहित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणालाही अवैध पद्धतीने ताब्यात घेतले जाऊ नये, असे खंडपीठाने सांगितले.
न्यायालयाबाहेरील फलक काढून टाकण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराबाहेर लावलेला तो फलक काढून टाकावा, ज्यावर ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिते’च्या कलम १६३ चा उल्लेख आहे, असे खंडपीठाने निर्देश दिले. या कलमान्वये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र जमण्यावर बंदी आहे. ‘‘सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कलम १६३ लागू केल्याबाबतचा सूचना फलक लावण्यात आल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही संबंधित प्राधिकरणाला निर्देश देतो की त्यांनी हा फलक काढून टाकावा, जेणेकरून नागरिक व वकील यांना न्यायालयापर्यंत पोहोचता येईल,’’ असे खंडपीठाने सांगितले.
न्यायालय काय म्हणाले?
’शहरात नागरिकांना मुक्त वावर करण्यास वाहतूक नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली जावी.
’कायदा-सुव्यवस्था व वाहतुकीची इतर परिस्थिती लक्षात घेऊन बॅरिकेड (अडथळे) लावण्याच्या आवश्यकतेचा त्वरित आढावा घेतला जावा.
’ मेट्रो व इंटरनेट सुविधा विनाअडथळा सुरू राहतील, असे सुनिश्चित करावे. मात्र ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’न्वये कारवाई करण्याचे प्रशासनाचे अधिकार हिरावून घेतलेले नाहीत, असेे न्यायालयाने स्पष्ट केले.
’ कायद्याने विहित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणालाही ताब्यात घेतले जाऊ नये.
अवमान याचिकेवरून अधिकार्यांना नोटीस
मेट्रो व रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालता येणार नाही, असे निर्देश असतानाही त्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाचा अवमान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. खंडपीठाने याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष डी. थारा यांना नोटिसा बजावल्या. संबंधित अधिकार्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत संबंधित याचिकेवर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही. त्यांच्या हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. – अभिजीत दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक
