एएनआय, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. स्वतःची बाजू मांडण्यासाठी आलेल्या एका पक्षकाराने न्यायाधीशांशी वाद घातला, न्यायालयात कागदपत्रे भिरकावली आणि सरन्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने न्यायालयाबाहेर काढण्यात आले. प्रबल प्रताप असे या पक्षकाराचे नाव आहे.

लखनऊतील एका अतिरिक्त पोलीस आयुक्ताविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मिळावेत, या मागणीसाठी प्रबल प्रताप सर्वोच्च न्यायालयात आला होता. त्याच्या प्रकरणाची सुनावणी न्या. के. व्ही. विश्वनाथन आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुरू होती.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांशी बोलताना पक्षकाराने आदरार्थी शब्द न वापरून रिवाजाचे उल्लंघन केले. त्यानंतर त्याने न्यायालयालाच आदेश देण्याच्या स्वरात बोलण्यास सुरुवात केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करताना त्याने ‘‘मी तुम्हाला आदेश देतो’’ असे वक्तव्य केले.

यावर न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त करत, ‘‘तुम्ही आम्हाला आदेश देत आहात का?’’ असा प्रश्न केला. त्यावर त्याने आपले बोलणे सुरुच ठेवले आणि आपण सर्वाेच्च सत्ताधारी असल्याचे सांगितले. त्याने अचानक हातातील कागदपत्रे न्यायालयात भिरकावली. या प्रकाराने काही काळ गोंधळ झाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढताना त्याने सरन्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे सांगितले जाते.

न्यायालयाची संयमाची भूमिका

सर्वोच्च न्यायालयात अशी घटना २०२५ मध्ये घडली होती. एका वकिलाने तत्कालीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणातही न्यायालयाने कठोर कारवाई न करता संयमाची भूमिका घेतली होती.