पीटीआय, नवी दिल्ली
विशेष सखोल फेरतपासणीअंतर्गत (एसआयआर) नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठीच्या ‘फॉर्म ६’मध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही बदलांना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही, अशी स्पष्टोक्ती सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी केली. ‘एसआयआर’बाबतच्या आक्षेपांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच ‘फॉर्म ६’ बदलल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला होता. तो सोमवारी खोटा ठरला. मात्र, ‘एसआयआर’मधील गैरप्रकारांबद्दल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगातील तीनपैकी दोन सदस्यांनी ‘एसआयआर’ मोहिमेतील काही निर्णयांसह ‘फॉर्म ६’मधील बदलांना विरोध केल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. ‘फॉर्म ६ मध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही बदलाला आम्ही संमती दिलेली नाही. याबाबतच्या नोंदी आमच्यासमोर आल्यानंतर बदल कोणी केले ते आम्हालाही पाहायचे आहे,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावली. पाटण्याचे राकेश कुमार सिंह यांनी याचप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेशी ही याचिका संलग्न करण्यात आली.
केंद्रीय निवडणूक आयोगातील सदस्य सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी ‘फॉर्म ६’मधील बदल बेकायदा असल्याचा आक्षेप नोंदवला होता. लोकप्रतिनिधी कायदा, १९५०चे कलम २८ आणि १९६०चा मतदार नोंदणी नियम यातील तरतुदींनुसार याबाबत संसदेत निर्णय होणे आवश्यक असल्याचे मतही या दोन्ही आयुक्तांनी मांडले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात नव्या मतदारांच्या समावेशासाठी ‘फॉर्म ६’मध्ये केलेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी आहे, असे म्हटले होते. याचा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केल्याने आयोग तोंडघशी पडला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून दबाव वाढत असताना न्यायालयाच्या स्पष्टोक्तीमुळे ते आणखी गोत्यात आले आहेत.
‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध करणार्या जनहित याचिकेत याचिकाकर्ते ॲड्. शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कृतींनी सामूहिक निर्णय घेण्याच्या कायदेशीर आवश्यकतेचे उल्लंघन झाले, असा याचिकेतील मुख्य दावा आहे. अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतलेले १४ निर्णय एकतर्फी घेण्यात आल्यामुळे ते रद्द करण्यात यावेत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायिक चौकशी समिती किंवा विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी याचिकाकर्त्यांची मुख्य मागणी आहे.
‘फॉर्म ६’वरील आक्षेप काय?
नवीन मतदार नोंदणीसाठी भरण्यात येणार्या ‘फॉर्म ६’मध्ये ‘एसआयआर’ प्रक्रियेअंतर्गत बदल करण्यात आले. त्यानुसार मतदाराचे पालक किंवा आजी-आजोबा यांचे मतदार तपशील भरणे आवश्यक होते. ही माहिती सहज उपलब्ध होत नव्हती तसेच ती न नोंदवता फॉर्म ६ दाखल करता येत नव्हता. त्यामुळे असंख्य नागरिकांना मतदार नोंदणी करता येत नसल्याचा या फॉर्मवर आक्षेप होता.
दोन निवडणूक आयुक्तांच्या संमतीविना निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याचा आरोप करणार्या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली.
नियमांनुसार न घेण्यात आलेले निर्णय आम्ही रद्द करू, असा इशाराही न्यायालयाने दिला. मात्र, याचिका निकाली निघेपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणतेही निर्णय घेण्यापासून रोखण्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही फेटाळून लावली.
आयोगाचा नवीन दावा
‘फॉर्म ६ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याच्यासोबत एक जाहीर प्रकटन जोडण्यात आले आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे,’ असे आयोगाने सायंकाळी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. बिहारमधील एसआयआर प्रक्रिया वैध ठरवणार्या २७ मेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात या प्रकटनाची नोंद असून त्याला न्यायालयाची मान्यता आहे, असे आयोगाने म्हटले.
ज्ञानेश कुमार यांनी मनमानीपणे आणि बेकायदा पद्धतीने फॉर्म ६मध्ये बदल केल्याचे सिद्ध झाले. भाजपला मदत करण्यासाठी ते पदाचा दुरुपयोग करत असल्याचा हा आणखी एक पुरावा. -राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
हा देश अतिशय लोकशाही पद्धतीने पुढे जात आहे. देशात सर्व संस्था स्वतंत्रपणे काम करत आहेत. सर्व प्रक्रिया आणि व्यवस्था पाळली जात आहे. यापेक्षा चांगले लोकशाही प्रारूप कोणते? – संबित पात्रा, भाजप प्रवक्ते
