पीटीआय, नवी दिल्ली
पक्षांतराच्या माध्यमातून ‘घटनात्मक पाप’ करणार्‍या आमदारांच्या गटाला पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळू शकते का, असा थेट प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केला. न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या वैधतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाच्या चिन्हामागील भावना आणि पक्षाची ओळख ही पक्षांतर करणार्‍यांबरोबर राहणार की पक्षांतराला विरोध करणार्‍या सदस्यांबरोबर, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शिवसेनेतील फुटीशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. ‘‘पक्ष कोणता हे ठरवताना आयोगाने विधिमंडळातील बहुमताचा आधार घेणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. चिन्ह वाटपाच्या नियमांनुसार ‘विधिमंडळातील बहुमत’ ही कसोटी अद्याप वैधे,’’ असा दावा कौल यांनी केला.

‘बहुमताची कसोटी सुरक्षित आहे का?’

न्या. बागची यांनी युक्तिवादावर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. ज्या सदस्यांविरोधात अपात्रतेची कार्यवाही सुरू आहे आणि जे नंतर अपात्र ठरू शकतात, त्यांच्या संख्येच्या आधारे पक्षाचे बहुमत कसे ठरवता येईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘‘घटनात्मक पाप करणार्‍या व्यक्तींसाठी पक्षचिन्हाची भावना लागू होईल की त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रार करणार्‍या व्यक्तींसाठी?’’ असा सवाल त्यांनी केला.

अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाचा निर्णय घेताना या परिस्थितीचा पुरेसा विचार केला का, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

आज पुन्हा सुनावणी

शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिले. आता न्यायालयासमोर या निर्णयाच्या घटनात्मक, कायदेशीर आधाराची तपासणी होत आहे. मंगळवारची सुनावणी अपूर्ण राहिली असून बुधवारी युक्तिवाद होणार आहे.

‘खरी शिवसेना’ ठरवताना संघटनेचीही कसोटी

पक्षाची खरी संघटना कोणाकडे आहे, हे ठरवताना केवळ आमदार-खासदारांची संख्या पुरेशी आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला. सदस्यांची संख्या मोजून तळागाळातील पाठिंबा ठरवणे भारतीय राजकारणातील सध्याच्या ‘गुंतागुंतीच्या परिस्थितीत’ अवघड ठरू शकते, असे न्या. बागची यांनी नमूद केले.

पक्षाच्या घटनेत संघटनेची रचना स्पष्टपणे लोकशाही पद्धतीची नसेल तर केवळ संघटनात्मक बहुमत हे तळागाळातील प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतिबिंब ठरेलच असे नाही, अशी शंकाही न्यायालयाने व्यक्त केली.