Supreme Court Hinduism Remark: “श्रद्धा सिद्ध करण्यासाठी हिंदूंनी मंदिरात जाण्याची गरज नाही”, असे महत्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. “हिंदुत्व ही जगण्याची पद्धत आहे. श्रद्धा सिद्ध करण्यासाठी वारंवार मंदिरात जाणे किंवा विधी करणे बंधनकारक नाही. श्रद्धा आहे हे सिद्ध करायला घरात एक दिवा पेटवला तरी पुरेसे आहे”, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. धार्मिक स्थळांवर महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावाशी निगडीत याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

धार्मिकस्थळी भेदभावाशी निगडीत याचिका

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह नऊ न्यायाधीशांचा समावेश असलेल्या घटनापीठाने धार्मिक स्थळांवर महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावाशी निगडीत याचिकेची सुनावणी घेतली. यामध्ये केरळमधील सबरीमाला मंदिराचाही समावेश होता. यासह दाऊदी बोहरा आणि विविध धार्मिक मान्यता आणि प्रथांचा या याचिकेत समावेश करण्यात आला आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रिसिद्ध केले आहे. सुनावणीच्या १५ व्या दिवशी वकील डॉ. जी. मोहन गोपाळ यांनी धार्मिक समुदायातून सामाजिक न्यायाची मागणी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

वकिलांनी युक्तिवाद काय केला?

“हिंदू धर्माला एक धार्मिक श्रेणी म्हणून परिभाषित केले गेले होते. त्यानंतर, १९६६ मध्ये जो धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या सर्व बाबींमध्ये वेदांना सर्वोच्च प्रमाण मानतो, तोच खरा हिंदू आहे, असे ठरवण्यात आले. त्यांनी मला कधी विचारले नाही. आमच्यापैकी कोणीही असे कधी म्हटले नाही,” असे मोहन गोपाळ यांनी युक्तिवाद करताना म्हटल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे. “मला देखील वेदांच्याप्रती आदर आहे. पण, आज हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती वेदांना आणि तत्त्वज्ञानाच्या सर्व बाबींमध्ये वेदांना सर्वोच्च प्रमाण मानतो का?,” असा सवाल गोपाल यांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले महत्वपूर्ण निरीक्षण

गोपाळ यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, “त्यामुळेच हिंदुत्वाला जगण्याची पद्धत म्हटले जाते. हिंदू राहण्यासाठी हिंदू व्यक्तीला मंदिरात जाणे किंवा विधी करणे बंधनकारक नाही. त्यासाठी कोणीही कर्मकांड करण्याची गरज नाही तसेच लोकांच्या श्रद्धेच्या आड देखील कोणी येऊ शकत नाही”. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याप्रकरणी बोलताना, “घरात एक दिवा लावणे देखील धर्म सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे”, असे निरीक्षण नोंदवले.

“प्रत्येक धर्मातील धार्मिक विधी आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींवर प्रत्येकजण शंका उपस्थित करु लागला आणि कोर्टात येऊ लागला तर अशा शेकडो याचिका दाखल होतील आणि यामुळे धर्मात फूट पडण्यास कारणीभूत ठरतील”, असे निरीक्षण देखील यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते.