नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विविध भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची सेवा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुरू केली. गुरुवारी, प्रजासत्ताक दिनापासून हे निकाल प्रादेशिक भाषांत मिळण्यास सुरुवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज खंडपीठाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना सांगितले, की सर्वोच्च न्यायालय ‘इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल’ (ई-एससीआर) प्रकल्पाचा एक भाग म्हणून अनुसूचित भारतीय भाषांमध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे उपलब्ध करून देण्याची विनामूल्य सेवा गुरुवारपासून कार्यान्वित करेल. ‘ई-एससीआर’ प्रकल्पात सध्या सुमारे ३४ हजार निर्णय उपलब्ध आहेत. हे नेमके निकाल शोधण्याचीही सुविधा यात आहे. यापैकी प्रादेशिक भाषांत एक हजार ९१ निवाडे उपलब्ध आहेत. ते उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात येतील. आमच्याकडे उडिया भाषेत २१, मराठीमध्ये १४, आसामीमध्ये चार, कन्नडमध्ये १७, मल्याळममध्ये २९, नेपाळीमध्ये तीन, पंजाबीमध्ये चार, तामिळमध्ये ५२, तेलुगूमध्ये २८ व उर्दूत तीन निकाल उपलब्ध आहेत, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व अनुसूचित भाषांत निकाल उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी यांसह राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये २२ भाषा समाविष्ट आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court judgments will available in four regional languages says cji chandrachud zws
First published on: 26-01-2023 at 04:52 IST