Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात दररोज वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी होत असते. यामध्ये अनेक वेगवेगळ्या खटल्यांचा समावेश असतो. आता अशाच एका खटल्यावरील सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणावर दिलेल्या आदेशानंतर याचिकाकर्त्याच्या वडिलांनी थेट सरन्यायाधीशांच्या भावाला फोन केल्याचा प्रकार घडला. या घटनेबाबत सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संताप व्यक्त करत वकिलाला म्हटलं की,’तुमच्या पक्षकाराविरुद्ध अवमान कारवाई का सुरू करू नये? माझ्या भावाला फोन करून सरन्यायाधीशांनी हा आदेश कसा दिला? हे विचारण्याची त्यांची हिंमत कशी झाली? आता ते मला सूचना देणार का?’, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त ‘लाईव्ह लॉ’ने दिलं आहे.

नेमकं प्रकरण घडलं?

हरियाणातील दोन विद्यार्थ्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. हे विद्यार्थी बौद्ध अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत उत्तर प्रदेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित होते. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपण बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा केला आणि पुरावा म्हणून प्रमाणपत्रेही सादर केले होते. मात्र. वैद्यकीय महाविद्यालयातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे धर्मांतर करण्यात आल्याचा संशय न्यायालयाला आला.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हरियाणाच्या मुख्य सचिवांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र जारी करण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. पण त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वडिलांनी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणात सरन्यायाधीशांना असं आढळून आलं की, हे विद्यार्थी सर्वसाधारण प्रवर्गातून येतात. त्यामुळे न्यायालयाने याला आरक्षणाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काय म्हटलं?

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितलं की, “आदेश दिल्यानंतर तुमच्या याचिकाकर्त्याच्या वडिलांनी थेट माझ्या भावाला फोन करून विचारलं की मी हा आदेश कसा देऊ शकतो? हे अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षकाराच्या वडिलांविरुद्ध अवमान कारवाई का सुरू करण्यात येऊ नये? त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का? की मी सर्व काही न्यायालयात सांगावं? त्यांनी माझ्या भावाला फोन करून मी हा आदेश कसा दिला असं विचारण्याचं धाडस केलं? आता तो मला सूचना देणार का? जर तुमचा पक्षकार अशा प्रकारे गैरवर्तन करत असेल तर वकील म्हणून तुम्ही सर्वात आधी त्या खटल्यातून स्वतःला बाजूला केलं पाहिजे. अशा लोकांशी कसं वागायचं हे मला माहीत आहे. हे मला धमकी देत ​​आहेत का? पण असं करण्याची हिंमत पुन्हा कधीही करू नका. कधीकधी तुम्हाला वाटतं की मी ही केस दुसऱ्याकडे वर्ग करेन? मी २३ वर्षांपासून अशा घटकांना हाताळत आलोय”, अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं. त्यानंतर वकीलाने या संपूर्ण प्रकरणाबाबत माफी मागितली.