“देशातील लाखो नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवणारी कोणतीही प्रक्रिया ही पूर्णपणे अन्यायकारक आहे. कोणतीही कारणे देऊन अशा प्रक्रियेचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि कोणतेही न्यायालयीन खंडपीठ याला मान्यता देऊ शकत नाही,” मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेवरून वाद निर्माण झाला असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी यासंबंधी हे महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
याच वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि पश्चिम बंगालमधील मतदारांवर झालेल्या अन्यायावर थेट बोट ठेवले आहे. या संदर्भातील वृत्त ‘लाईव्ह लॉ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीशांनी नोंदवलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आल्या आहेत.
‘शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखे…’
“मतदारयादीतून केवळ मृत मतदाराचे नाव वगळले जाऊ शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यमान मतदाराचे नाव त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि आपली बाजू मांडण्याची संधी न देता मतदारयादीतून वगळले जाऊ शकत नाही. एकदा मतदारयादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर सूचना आणि सुनावणीशिवाय ते वगळता येत नाही. भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वापासून मतदानाचा अधिकार किंवा मतदारयादीत नाव समाविष्ट होण्याचा अधिकार वेगळा करता येत नाही. हे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखेच ठरेल”, असे न्या. भुयान म्हणाले.
‘नागरिकांना मताधिकारापासून दूर ठेवणे संविधानाच्या आत्म्यावर प्रहार’
“कोट्यवधी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी कोणतीही प्रक्रिया मूलभूतपणे मनमानी आणि घटनात्मक व्यवस्थेचे उल्लंघन करणारी आहे,” असे परखड मत न्या. भुयान यांनी व्यक्त केले. “कुठल्याही प्रकारची तुलना किंवा कुतर्क करून अशा प्रक्रियेचे समर्थन केले जाऊ शकत नाही. ही बाब भारताच्या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर आणि आत्म्यावर थेट प्रहार करते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
पश्चिम बंगालमधील ९० लाख मतदारांचा मुद्दा: माजी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन यांनी या विषयावर बोलताना पश्चिम बंगालमधील धक्कादायक आकडेवारी समोर आणली.
“पश्चिम बंगालमध्ये तब्बल ९० लाख मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक मताधिकारापासून दूर राहूनही सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रक्रियेला स्थगिती मिळेपर्यंत हालचाली झाल्या नाहीत, ही बाब गंभीर आहे,” असे न्यायमूर्ती नरिमन म्हणाले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सुमारे २२ लाख मतदारांनी या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. ज्या १ लाख अपीलांवर सुनावणी पूर्ण झाली, त्यांपैकी ९३ टक्के प्रकरणांत सामान्य मतदारांच्या बाजूने निकाल लागला.
न्यायमूर्ती नरिमन म्हणाले, “यावरून हे स्पष्ट होते की, सामान्य नागरिकांना बेकायदेशीरपणे निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले होते. आपल्या देशात घडणाऱ्या या घडामोडी अत्यंत चिंताजनक आहेत.”
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) नियुक्तीबाबतच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय दिला पाहिजे, अशी मागणी करत न्यायमूर्ती नरिमन म्हणाले, “अशा प्रकारे विस्कळीत आणि त्रुटीपूर्ण काम करणारा निवडणूक आयोग देशात असू शकत नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक यंत्रणेची पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे.”
SIR आणि मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या या वादात, उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेली ही मते येणाऱ्या काळात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत.
