सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २० वा दिवस आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. मात्र देशभरातून त्यांना पाठिंबा वाढतो आहे. कॉमेडियन कुणाल कामराने सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला. कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे देशाने उभं राहिलं पाहिजे असंही तो म्हणाला. मात्र त्याचवेळी त्याने केलेलं एक विधान त्याला भोवलं आहे. ज्यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या आहेत.
कुणाल कामरा विद्यार्थ्यांना काय म्हणाला होता?
माझं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्हाला जर कुणी मोदी समर्थक किंवा भाजपाचा मतदार भेटला तर त्याच्याशी अगदी सहजपणे बोला, वाद घालू नका. आपल्याला रोग्याचा नाही तर रोगाचा इलाज करायचा आहे. मोदींनी केलं तर योग्य केलं असं ते म्हणत असतील तर तुमचा वेळ वाया घालवू नका तिथून निघून जा. या सरकारला कुठलीही लाज वाटत नाही. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातले आणखी एक गांधी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही, त्यांना कसली चिंताच नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, काही शेतकरी आहेत, काही बेरोजगार आहेत. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने भारताच्या सरन्यायाधीशांचे आभार मानतो कारण त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यासाठीची पहिली वीट ठेवली. असं म्हणत कुणाल कामराने सरन्यायाधीशांनाही टोला लगावला आहे.
सीता के पती और नीता के पतीचं वक्तव्य काय?
आपल्या याच भाषणात कुणाल कामरा म्हणाला “ये सीता के पती का नाम ले रहें है और नीता के पती का काम कर रहे हैं.” (रामाचं नाव घेता पण काम करता ते मुकेश अंबांनींचं) असं सरकारला उद्देशून कुणाल कामराने म्हटलं होतं. नेमक्या याच वाक्यामुळे कुणाल कामराच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाने कुणाल कामराला याच वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नोटीस धाडली आहे. कुणाल कामराने हा व्हिडीओ डिलिट करावा आणि तातडीने माफी मागावी अशी मागणी यात करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकील अमिता सचदेव यांनी ही नोटीस कुणाल कामराला धाडली आहे.
अमिता सचदेव यांनी काय म्हटलंय?
कुणाल कामराने खुशाल सरकारवर टीका करावी. त्याबाबत माझा आक्षेप नाही. कुठल्याही विषयावरुन सरकारवर केलेली टीका किंवा केलेलं विधान हे मी समजू शकते. पण देव ही पवित्र भावना आहे. आमच्या देवाचं नाव बदनाम करायचं नाही. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळेच कुणाल कामराने जाहीर माफी मागितली पाहिजे आणि वक्तव्य सोशल मीडियावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत असं अमिता सचदेव यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
