नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमध्ये उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित अदानी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण हाती घ्यावी आणि त्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, स्वित्सर्लंडमधील प्रशासनाने अदानींशी दीर्घकाळ संबंधित असलेल्या चँग-चुंग लिंग यांच्या पाच बँक खात्यांतील ३१.१ कोटी अमेरिकी डॉलर (२६१० कोटी) गोठवल्याचे समोर आले आहे. स्वित्झर्लंडच्या आर्थिक गैरव्यवहार कार्यालयाने याबाबत चौकशी केली. डिसेंबर २०२१पासून ही चौकशी सुरू होती.

हेही वाचा >>> ‘अदानीं’शी संलग्न स्विस खाती गोठवली; ‘हिंडेनबर्ग’चा नवा दावा; समूहाचा इन्कार

अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने याबाबत ट्वीट केले आहे. त्यात म्हटले आहे, की स्वित्झर्लंडमधील गुन्हेगारी नोंदीनुसार स्विस प्रशासनाने विविध अकाउंटमधील ३१ कोटी डॉलरहून अधिक निधी गोठवला आहे. अदानींशी संबंधित व्यक्तींनी ‘बीव्हीआय/मॉरिशस अँड बर्म्युडा’ फंड्समध्ये कशी गुंतवणूक केली, याचे सविस्तर तपशील तक्रारदारांनी दिले आहेत. ‘मॉरिशस अँड बर्म्युडा’कडे अदानींच्या शेअरची जवळजवळ मालकी असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अदानी समूहाकडून खंडन

अदानी समूहाने या वृत्ताचे खंडन केले आहे. ‘या निराधार वृत्ताचे आम्ही खंडन करतो. स्वित्झर्लंडमधील कुठल्याही न्यायालयातील सुनावणीमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. तसेच, स्विस प्रशासनाकडून कंपनीच्या कुठल्याही अकाउंटवर जप्तीची कारवाई होऊ घातलेली नाही,’ असे अदानी समूहाने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची पुरींविरोधात तक्रार

नवी दिल्ली : सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी-बुच यांच्याविरुद्ध तृणमूल काँग्रेसचे खासदार माहुआ मोइत्रा यांनी लोकपालकडे तक्रार केली आहे. चौकशीसाठी ईडी किंवा सीबीआयकडे तक्रार पुढे पाठवावी असे त्यांनी म्हटले आहे.ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे मोइत्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘पुरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लोकपालांनी ३० दिवसांत हे प्रकरण सीबीआय किंवा ईडीकडे प्राथमिक चौकशीसाठी पाठवायला हवे. त्यानंतर एफआयआर दाखल करून पूर्णपणे त्याची चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येकाची चौकशी व्हायला हवी.’’