Supreme Court Pellet Gun Notice: दिल्लीच्या जंतरमंतरवर CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषणदेखील केले. या आंदोलनाचं यश म्हणून तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET परीक्षा गैरप्रकाराची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. मात्र, आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर यामुळे जखमी झालेले आंदोलक या मुद्द्यावर आता वातावरण तापू लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल झाली असून सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला बंदुकीच्या गोळ्यांबाबत नोटीस बजावली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश!

माजी IPS अधिकारी यशोवर्धन आझाद व पॅलेट गनच्या गोळ्या लागून जखमी झालेल्या दोन व्यक्तींनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेव्हा सामान्य नागरिक आंदोलनात उतरलेले असतात, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा पथकांकडून पॅलेट गनच्या वापरावर बंदी आणली जावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेस दिले. जंतरमंतरवर आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या RAF अर्थात रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांच्या बंदुकांच्या गोळ्यांचा हिशेब ठेवावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

याचिकाकर्त्यांचे दावे काय?

याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये दिल्ली पोलिसांनी वापर केलेल्या बॅलेट गनबाबत प्रामुख्याने आक्षेप घेण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांच्या मते, पॅलेट गन या कमी हानी करणाऱ्या किंवा अजिबात हानी न करणाऱ्या म्हणून खऱ्या बंदुकांना पर्याय म्हणून वापरल्या जातात. पण जेव्हा त्यांचा वापर मोठ्या जमावावर अतिशय जवळून केला जातो, तेव्हा त्यातून जीवघेणी किंवा गंभीर इजा होऊ शकते. जंतरमंतरवर झालेल्या पॅलेट गनच्या वापरामध्ये एका १९ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच संदर्भात याचिकाकर्त्यांनी दिल्ली पोलिसांना याचिकेत लक्ष्य केलं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मार्गदर्शक सूचना काय सांगतात?

दरम्यान, याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचादेखील उल्लेख केला. अशा प्रकारची कमी हानी करणारी शस्त्र जमावावर वापरण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांनीदेखील स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामध्ये पॅलेट गनचा वापर करणं हे आवश्यकता, आवाका आणि कारण या तिन्ही प्रकारच्या घटनात्मक चौकटीमध्ये बसत नाही, असं सांगण्यात आल्याचं याचिकेत नमूद केलं आहे.

या प्रकरणात २५ वर्षीय प्रशांत कुमार सिंह हा तरुणदेखील या खटल्यात याचिकाकर्ता आहे. २० जुलै रोजीच्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान पोलिसांनी झाडलेल्या पॅलेट गनच्या गोळ्यांनी हा तरुणदेखील जखमी झाला आहे. आपल्या बाजूने कोणतीही आक्रमकता किंवा भडकाऊ कृती न होऊनदेखील शीघ्र कृती दलाच्या जवानांकडून पॅलेट गनचा वापर केला गेला. याशिवाय, २६ वर्षीय शेख इरशाद मन्सूरी हा तरुणदेखील यात याचिकाकर्ता असून आपण दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात व्हिसाशी संबंधित कामानिमित्त गेलो असताना आपल्यावरही पॅलेट गनच्या गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा त्यानं केला आहे.