Kids social media ban supreme court notice : मुलांच्या सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादेनुसार निर्बंध घालण्याची आणि त्यांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी व्यापक नियमावली तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागितले. इंदूरमधील ‘एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल’ आणि शाळेचे संचालक सिद्धार्थ सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. याबद्दल सविस्तर वृत्त ‘बार अँड बेंच’ने आले आहे.
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादेची मागणी
सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. केंद्र सरकार, महिला आणि बालविकास मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय तसेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुलांच्या सोशल मीडिया वापराशी संबंधित धोक्यांना आळा घालण्यासाठी व्यापक नियामक चौकट तयार करून तिची अंमलबजावणी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ठरावीक वयाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणे, तसेच अल्पवयीन मुलांना खाती तयार करणे, चालवणे आणि वापरणे यासाठी वयानुसार निर्बंध लागू करणे असे प्रस्तावही याचिकेत मांडण्यात आले आहेत.
सायबर छळापासून मानसिक आरोग्यापर्यंत चिंता
सोशल मीडियामुळे मुलांना ऑनलाइन आमिष दाखवणे, लैंगिक शोषण, सायबर छळ आणि वयानुसार अयोग्य मजकुराचा सामना करावा लागू शकतो, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा अनियंत्रित वापर करण्याची सवय लागण्याचाही धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय नैराश्य, चिंता, इतरांशी सतत तुलना करणे, शरीराच्या प्रतिमेबाबत असमाधान, खाण्याच्या सवयींमधील बिघाड आणि झोपेच्या समस्यांसारख्या परिणामांकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. मुलांना हिंसक किंवा लैंगिक स्वरूपाचा कंटेंट तसेच स्वतःला इजा पोहोचवण्याशी आणि आत्महत्येशी संबंधित विषय दिसण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
केवळ पालकांच्या नियंत्रणावर अवलंबून राहणे पुरेसे नाही?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सच्या आवडीनिवडी आणि सवयी तपासून त्यांना तसाच कंटेंट दाखवतात. यामुळे मुलांचा वापर अनावश्यकपणे वाढू शकतो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. मुलांच्या खासगी प्रतिमांचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या प्रकारांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या धोक्यांचे गंभीर परिणाम होईपर्यंत ते अनेकदा लक्षात येत नाहीत, त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांची आश्वासने, सुरक्षा उपाय किंवा पालकांकडून वापरल्या जाणाऱ्या नियंत्रण यंत्रणा एवढ्याच उपायांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुलांच्या मूलभूत हक्कांचा मुद्दा
मुलांचे ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. सरकारची ही भूमिका मनमानी असून त्यामुळे मुलांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे असे घोषित करावे, अशी मागणी यात केली आहे. यामध्ये समानतेचा हक्क, जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क तसेच शिक्षणाचा हक्क यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले असले, तरी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम आदेश दिलेला नाही. पुढील सुनावणीत या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
