केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली. “निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतही ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा थेट नकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने अंतरिम आदेश जारी करावा, अन्यथा देशातील लोकशाही प्रक्रियेची मोठी हानी होईल,” असा इशारा याचिकाकर्त्यांनी कोर्टात दिला. इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानंतर प्रकरण बाहेर

काही दिवसांपूर्वी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या एका तपास अहवालात निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. गेल्या १० महिन्यांत विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल १४ वेळा तीव्र आक्षेप नोंदवले होते.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी अनेक निर्णय आपल्या (इतर दोन आयुक्तांच्या) संमतीशिवाय आणि परस्पर घेतल्याचा आरोप या दोन्ही आयुक्तांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर मतदार याद्यांशी संबंधित सॉफ्टवेअरच्या सुरक्षिततेबाबत आणि पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करणारी पत्रे या दोन्ही आयुक्तांनी देशाचे कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना स्वतंत्रपणे लिहिली होती.

दरम्यान, निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “संधू आणि जोशी यांनी कॅबिनेट सचिवांना लिहिलेली पत्रे एका प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याशी संबंधित होती. त्याचा धोरणात्मक निर्णय किंवा आयटी विभागाशी कोणताही थेट संबंध नाही.”

घटनेच्या कलम ३२४ चा संदर्भ देत ‘एसआयटी’ चौकशीची मागणी

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत:

  • पहिली याचिका (राकेश कुमार सिंग, पाटणा): भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४(१) नुसार निवडणुकीचे नियंत्रण आणि संचालन हे केवळ एका मुख्य निवडणूक आयुक्तांचे नसून पूर्ण ‘आयोगा’चे आहे. त्यामुळे इतर आयुक्तांना डावलून घेतलेले निर्णय आणि राबवलेली ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया ही सुरुवातीपासूनच बेकायदेशीर आणि अधिकारबाह्य घोषित करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
  • दुसरी याचिका (शैलेश मणी त्रिपाठी, वकील): २३ सप्टेंबर २०२६ रोजी समोर आलेल्या दस्तऐवजांवरून निवडणूक आयोगाच्या घटनात्मक चौकटीलाच तडे गेल्याचे स्पष्ट होते. मुख्य निवडणूक आयुक्तांचे हे वर्तन त्यांच्या प्रशासकीय अधिकारांच्या कचाट्यात बसणारे नसून तो वैयक्तिक गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील ‘एसआयटी’ (SIT) किंवा उच्चस्तरीय न्यायिक आयोगामार्फत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी.

केंद्रीय निवडणूक आयोगातील या ऐतिहासिक अंतर्गत वादामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे येत्या दिवसांत निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर पुढील काय सुनावणी होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मतदार नोंदणी फॉर्म ६ मधील बदलांवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे विधान

नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ (Form 6) मधील कोणत्याही बदलावांना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सोमवारी केली. निवडणूक आयोगाकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर या अर्जात नेमके कोणी आणि कसे बदल केले, याची सखोल तपासणी केली जाईल, असे संकेतही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना हे विधान समोर आले आहे. इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.