सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लग्नाच्या आधीच्या नातेसंबंधांवर महत्त्वाचे तोंडी निरीक्षण नोंदवले आहे. लग्नाचे आश्वासन आणि बलात्कारचे आरोपा असलेल्या एका प्रकरणात जामीनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ही टिप्पणी केली आहे.

लग्नाचे आश्वासन देऊन महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीच्या जामीनाच्या याचिकेवर  न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. महत्त्वाची बाबा म्हणजे संबंधित व्यक्ती आधीच विवाहित असून देखील त्याने हे आश्वासन दिले होते आणि नंतर दुसर्‍या महिलेशी लग्न केले.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्न यांनी लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले.

“कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू, पण लग्नापूर्वी एक मुलगा आणि एक मुलगी हे पूर्णपणे अनोळखी असतात. त्यांचे नाते कितीही घट्ट किंवा नाजूक असले, तरी लग्नापूर्वी ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात, हे आम्हाला समजत नाही,” असे त्यांनी नमूद केले.

“तुम्ही खूप सावध असले पाहिजे. लग्नाच्या आधी कोणीही कोणावरही विश्वास ठेवू नये,” असेही त्या म्हणाल्या.

कोर्टात देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिला व पुरूष हे २०२२ मध्ये एका मॅट्रिमोनिअल सर्व्हिसेस वेबसाईटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले.

सरकारी वकिलांनी असा आरोप केला की पुरुषाने महिलेला तिच्याबरोबर लग्न करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्या आधारावर महिलेने शारीरिक संबंध ठेवले, जे दुबईतील भेटींपर्यंत वाढले.

सरकारी पक्षाने असाही दावा केला आहे की, महिलेच्या परवानगीशिवाय त्यांच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले होते आणि तिला ते व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला नंतर आढळून आले की त्या व्यक्तीचे आधीच लग्न झालेले होते आणि असे असूनही त्याने जानेवारी २०२४ मध्ये पंजाब येथे दुसर्‍याच एका महिलेशी लग्न केले होते.

महिला लग्नाच्या आधी दुबईला का गेली असा प्रश्नही न्यायमूर्ती नागरत्न यांनी यावेळी विचारला.

जेव्हा सरकारी वकिलांनी स्पष्ट केले की दोघे मॅट्रोमोनियल साईटवर भेटले होते आणि लग्नाचा विचार करत होते, तेव्हा न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवले की, जर महिलेचा लग्नाबद्दल निर्णय पक्का होता, तर मग तिने लग्नाच्या आधी प्रवास करायला नको होता.

“जर ती इतकी काटेकोर होती, तर तिने लग्नापूर्वी जायला नको होते. आम्ही त्यांना मध्यस्थीसाठी पाठवू. जेव्हा संमतीने संबंध प्रस्थापित झाले असतील, तर खटला चालवून शिक्षा करावी असे हे प्रकरण नाही.” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे.