दिल्लीमध्ये वाढत असलेली प्रदूषणाची पातळी हा मुद्दा देशपातळीवर सध्या चर्चेचा ठरला आहे. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी या हंगामात शेतातील तण जाळत असल्यामुळे त्याचा परिणाम होऊन दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावरून दिल्ली सरकारला फटकारलं आहे. शेतकऱ्यांनी तण जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषणात वाढ झाल्याचा दावा सरकराकडून केला जात असताना त्यावर न्यायालयानं संतप्त शब्दांत सुनावलं आहे.

पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये सध्या शेतकरी शेतात अतिरिक्त ठरलेलं तण जाळत आहेत. पण यामुळे दिल्लीतील वातावरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. तसेच, यावरून राजकीय वातावरण देखील चांगलंच पेटलं आहे. न्यायालयाबाहेर आरोप-प्रत्यारोप होत असताना न्यायालयात यावरून खडाजंगी सुरू आहे. आता तर थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची बाजू घेत सरकराला परखड शब्दांत फटकारलं आहे.

“दिल्लीतीर फाईव्ह स्टार, सेव्हन स्टारसारख्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये बसून लोक शेतकरी कसे प्रदूषणात भर घालत आहेत यावर बोलत आहेत. तुम्ही कधी त्यांना जमिनीतून मिळणारं उत्पन्न पाहिलं आहे का?” असा परखड सवालच न्यायालयानं केला आहे. तसेच, “आपण या वास्तवाकडेही डोळेझाक करतो की बंदी असूनही फटाके मात्र सर्रासपणे फोडले जात आहेत”, असं देखील न्यायालयाने नमूद केलं.

“इतर कशाहीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांमुळे जास्त प्रदूषण होतं”, देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान!

दिल्लीतील प्रदूषणासंदर्भा सुनावणी सुरू असताना न्यायालयानं प्रदूषण कमी करण्यासाठी काही सूचना देखील केल्या. “तुम्ही एक-दोन दिवस सरकारी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचा पर्याय का नाही तपासून पाहात? पूर्ण ट्रॅफिकच एक-दोन दिवस बंद का नाही ठेवत?” अशी विचारणा न्यायालयाने केली. यावेळी “दिल्ली एकमेव शहर आहे जे १०० टक्के वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत आहे. आम्ही त्यासाठी आर्थिक मदत देखील दिली आहे”, असं दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलं आहे.