Supreme Court on BJP Minister Vijay Shah Over His Comments On Col Sofiya Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची स्वत:हून दखल घेत हे निर्देश दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना चांगलेच सुनावले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान “तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्यं करता,” असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना विचारला आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या याचिकेवर तात्काळ हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच मंत्र्यांनी जबाबदारीने बोलवे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खडपीठीने हे प्रकरण शुक्रवारी ऐकू असेही सांगितले आहे.

कुंवर विजय शाह यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी याचिका न्यायालयासमोर मांडल्यानंतर सरन्यायाधीशांनी महत्त्वाचे विधान केले. “सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने काही मर्यादा पाळणे अपेक्षित असते. मंत्र्यांने उच्चारलेले प्रत्येक वाक्य जबाबदारीपूर्वक असले पाहिजे,” असे सरन्यायाधीश बी. आर गवई म्हणाले.

“संवैधानिक पदावर असलेल्या अशा व्यक्तीने जबाबदार असले पाहिजे… जेव्हा देश अशा परिस्थितीतून जात आहे… फक्त तुम्ही मंत्री आहात म्हणून…,” अशा शब्दात सरन्यायाधीश गवई यांनी मंत्र्यांना सुनावले.

पुढे मखीजा म्हणाले की शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. यावर न्यायमूर्ती गवई म्हणाले, “जा आणि उच्च न्यायालयात माफी मागा.” यानंतर वकिलांनी न्यायालयाने प्रकरण विचारात घ्यावे असा आग्रह धरताच, सरन्यायाधीश गवई यांनी हे प्रकरण उद्या ऐकले जाईल असे सांगितले.

नेमकं झालं काय होतं?

मंत्री शाह यांनी एका सभेत बोलताना कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’ असा केला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत देशवासीयांना वेळोवेळी माहिती देणार्‍या कर्नल सोफिया कुरेशी या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह या लष्करी मोहिमेचा चेहरा बनले होते.

कुंवर विजय शाह यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवरून न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकाले आहे. तसेच अशा प्रकारचे विधान धोकादायक असल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. ज्यानंतर शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५२, कलम १९६ (१) आणि कलम १९७ (१) (क) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरून कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेलं विधान हे फुटीरतावादी कारवायांच्या भावनांना प्रोत्साहन देणारं आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

उच्च न्यायालयाने काय म्हटले?

सार्वभौमत्व, शिस्त, त्याग, आत्मसमर्पन, शील, मान आणि अदम्य शौर्य यांचे प्रतिबिंब असलेली सैन्यदले ही बहुधा शेवटची यंत्रणा असावी. शाह यांनी कर्नल कुरेशींबाबत बोलताना अत्यंत घृणास्पद भाषेचा वापर केला आहे. शाह यांनी कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचे हे अक्षम्य विधान कर्नल कुरेशींबद्दलच आहे. – मध्य प्रदेश उच्च न्यायालय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंवर विजय शाह काय म्हणाले होते?

मंगळवारी मध्यप्रदेशमधील एका सभेत बोलताना शाह म्हणाले की, “त्यांनी आमच्या मुलींचा कपाळावरील ‘सिंदूर’ पुसला, आम्ही त्यांच्यात बहिणीला पाठवून त्यांची वाट लावून टाकली.” दरम्यान त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. यानंतर त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दहा वेळा माफी मागण्यास तयार असल्याचे म्हणत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने याप्रकरणी याचिका दाखल करून घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.