Supreme Court on Firecrackers public awareness : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना, सणासुदीच्या काळात फटाके फोडणे आणि धर्म यांच्यातील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धार्मिक भावना आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टींचा विचार करून न्यायालय संतुलित भूमिका घेतली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी विचारलं, “फटाक्यांचा धर्माशी काय संबंध आहे?” या प्रकरणातील अमिकस क्युरी ज्येष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी सांगितलं की, फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे हा युक्तिवाद दरवर्षी केला जातो. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या, “आपल्या नावामुळे लहान मुले आजारी पडत आहेत आणि त्यांना त्रास होत आहे हे जर देवांना समजलं, तर त्यांनाही अत्यंत वाईट वाटेल.”

न्यायालय धार्मिक भावना दुखावणार नाही, पण…

या युक्तिवादाला उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, न्यायालय धार्मिक भावना दुखावणार नाही, परंतु पर्यावरणाविषयीच्या चिंतेचीही जाणीव ठेवेल. “आम्ही धार्मिक भावना दुखावणार नाही. लोकांनी स्वतःहून आत्मपरीक्षण करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्ही उपाययोजना करू शकता”, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. मात्र, अपराजिता सिंग यांनी स्पष्ट केलं की, दरवर्षी हेच युक्तिवाद केले जातात, पण अंमलबजावणीमध्ये फारशी सुधारणा होत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे जनजागृतीचे आवाहन

सुनावणीदरम्यान फटाके व्यापाऱ्यांच्या महासंघातर्फे हजर झालेले ज्येष्ठ वकील जे. साई दीपक यांनी फटाक्यांवरील सध्याच्या निर्बंधांचा संदर्भ दिला. त्यावर सरन्यायाधीशांनी भर दिला की, आदेश जारी करताना न्यायालयाने सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. फटाक्यांच्या घातक दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करणं आणि दिव्यांची रोषणाई करून सण साजरा करण्यास प्रोत्साहन देणं यावर भर दिला पाहिजे.

विशिष्ट वेळेत फटाक्यांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन करणारी जनजागृतीपर सामग्री प्रकाशित केली जावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली. तसंच, बाजारात केवळ ठराविक श्रेणीतील फटाकेच उपलब्ध करून देणे आणि घातक फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव न्यायालयाने मांडला. मात्र, अपराजिता सिंग यांनी अंमलबजावणीच्या अभावाकडे लक्ष वेधत म्हटलं की, हितसंबंधी घटकांना मोकळे रान मिळाले आहे आणि अंमलबजावणीची कोणालाही पर्वा नाही.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी खंडपीठाला माहिती दिली की, दिल्लीत विशिष्ट वेळेत दोन दिवसांसाठी फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणांना अजून वेळ असताना अशा सक्तीच्या निर्बंधांच्या गरजेवर प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीश म्हणाले की, लोकांनी आपल्या इच्छेनुसार सण साजरा करावा, मात्र फटाके फोडणे ठराविक तासांपुरतेच मर्यादित ठेवावे, यासाठी त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे.