नवी दिल्ली : द्वेषपूर्ण भाषणांबाबत दाखल विविध खटल्यांच्या तपासात म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचे ताशेरे ओढत येत्या दोन आठवडय़ांत अहवाल सादर करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. राजधानीमध्ये २०२१मध्ये झालेल्या विविध धार्मिक परिषदांमधील भाषणांबाबत न्यायालयाने पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

हरिद्वार आणि दिल्लीमध्ये झालेल्या ‘धर्मसंसदे’मध्ये झालेल्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत दाखल तक्रारींवर उत्तराखंड आणि दिल्ली पोलिसांनी निष्क्रीयता दाखविल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अतिरिक्त महान्यायवादी के. एम. नटराजन यांना न्यायालयाने अनेक प्रश्न केले. ‘घटना १९ डिसेंबर २०२१ला घडली असताना त्याचा प्रथमिक तपासणी अहवाल (एफआयआर) ४ मे २०२२ रोजी दाखल झाला. यासाठी तुम्हाला पाच महिने का लागले?’ अशा परखड शब्दांत न्यायालयाने कानउघाडणी केली. तुषार गांधी यांची बाजू मांडताना अ‍ॅड. शदान फरासत यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांवर अवमानाबाबत कारवाई नको आहे, मात्र या प्रकरणात तपास किती झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. नटराजन यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की दिल्ली पोलिसांनी तहसिन पूनावाला प्रकरणी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने न्यायालयाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही. त्याच वेळी तपास यंत्रणांनी कशा पद्धतीने काम करावे, हे तुषार गांधी ठरवू शकत नाहीत. मात्र या उत्तरावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायायलाने अनेक प्रश्न उपस्थित करतानाच दिल्लीच्या तपास अधिकाऱ्यांनी दोन आठवडय़ांत तपासातील प्रगतीबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले. 

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

पोलिसांना न्यायालयाचे चार प्रश्न

– तपासाबाबत तुम्ही काय करत आहात?

– एफआयआर नोंदविण्यासाठी पाच महिने का लागले?

– आतापर्यंत किती जणांना अटक झाली?

– आतापर्यंत किती जणांची चौकशी केली गेली?

प्रकरण काय?

१७ ते १९ डिसेंबर २०२१ रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आणि १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या ‘धर्म संसद’ या धार्मिक मेळाव्यामध्ये एका विशिष्ट समाजाबाबत द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचा आरोप झाला. त्यावर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या सूचनांचे पालन होत नसून त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप करत तुषार गांधी यांनी याचिका दाखल केली आहे.