नवी दिल्ली : ‘एखाद्या व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ अटक करण्याची किंवा ताब्यात घेण्याची कारणे न दिल्यामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीची सुटका केली असेल तर, तिला पुन्हा अटक करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची संमती घेणे तपास संस्थेसाठी अनिवार्य असेल,’ असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. तसेच, अटक करताना संबंधित व्यक्तीला त्याचे लेखी कारण दिले गेले नाही, तर ते तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २९ मे रोजी दिलेला आदेश न्या. उज्जल भुयान आणि न्या. अतुल शरदश्चंद्र यांच्या खंडपीठाने रद्द केला. त्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जसकरणजीत सिंग देओल या ‘पोक्सो’ गुन्ह्यातील आरोपीने आपली अटक रद्द करावी अशी विनंती करणारी याचिका फेटाळली होती. तो आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद २२च्या दोन कलमांचा संदर्भ दिला.

राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(१)नुसार, कोणत्याही व्यक्तीला कारण न देता अटक करता येत नाही. तसेच, अनुच्छेद २२(२)नुसार, कोणत्याही व्यक्तीला अटक केल्यास किंवा ताब्यात घेतल्यास तिला २४ तासांच्या कालावधीत सर्वात जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले पाहिजे. या तरतुदी डावलता येणार नाहीत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. जर अनुच्छेद २२(१)चे उल्लंघन झाले तर आरोपीला पुन्हा अटक करण्याचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्याकडे असता कामा नये, तसेच पुन्हा अशी अटक करण्यास न्यायालयाची मान्यता असली पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. राज्यघटना किंवा घटनात्मक तरतुदीचा निरपेक्ष अर्थ लावता येऊ शकत नाही आणि राज्यघटनेचे आकलन करण्याचे काम ‘जर-तर’सारख्या अनिश्चित बाबींवर सोपवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.

व्यक्तीला अटक करण्यासंबंधी राज्यघटनेत आखून दिलेल्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी केली जावी आणि त्यामध्ये तो दोषी आढळल्यास त्याच्यावर विभागीय कारवाई केली जावी, असेही स्पष्ट केले. राज्यघटनेने निर्दिष्ट केलेली एखादी प्रक्रिया किंवा कायद्यांमुळे नागरिकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असेल तर अशा प्रक्रियेवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असे हा निकाल लिहिलेल्या न्या. भुयान यांनी म्हटले.

राज्यघटना वैधानिक मर्यादेच्या कितीतरी वर, विशिष्ट मूलभूत तत्त्वांवर आधारलेली आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या किंवा घटनात्मक तरतुदीच्या उल्लंघनाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. ही बाब काटेकोरपणेच हाताळली पाहिजे. ते गुन्ह्याचे स्वरूप किंवा गांभीर्य यावर अवलंबून नाही. त्याचे मर्यादित पद्धतीने आकलन करता येणार नाही. – सर्वोच्च न्यायालय

विभागीय चौकशीची शिफारस

अशा प्रकरणांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा संगनमत टाळण्यासाठी, फेरअटकेची मागणी करणाऱ्या अर्जाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समर्थन असले पाहिजे. जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याने घटनात्मक तरतुदीचे उल्लंघन केलेल्या कृत्याची कल्पना असायला हवी. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी त्याचा तपास अन्य अधिकाऱ्याकडे सोपवेल. त्यानंतर कर्तव्यात गंभीर कसूर केल्याबद्दल त्याची विभागीय चौकशी केली जाईल. चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांविरोधात काही विपरित निष्कर्ष आढळल्यास त्याच्याविरोधात विभागीय कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.