Supreme Court CJP March September 5 Delhi Protest: कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP ने येत्या ५ सप्टेंबरला दिल्लीत शांतता मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तसंच देशभरात शांतता मोर्चा काढण्याचं आवाहनही तरुणाईला केलं आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत या मोर्चावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कोणतीही अनुचित घटना घडेल असं गृहीत धरण्यासाठी कोणतीही अपरिहार्य परिस्थिती नसल्याचं भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत १२-१३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. त्यामुळे सीजेपीच्या प्रस्तावित मोर्चावर निर्बंध लादावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा आहे. सर्व पक्षांनी शांततेने, जबाबदारीने आणि कायद्याचे पालन करून वागावे, याची खात्री प्रशासनाने करावी, असंही त्यांनी नमूद केले.

कॉक्रोच जनता पार्टीच्या शांतता मोर्चाचा उद्देश काय?

५ सप्टेंबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत शांतता मोर्चा काढण्यात येणार आहे. अशा शांतता आंदोलनाचं देशभरात आयोजन करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने २५ जुलैला जी आश्वासनं दिली होती त्यानंतर सीजेपीने जंतर-मंतरवरचं आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र अजूनही आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. त्यामुळे येत्या ५ सप्टेंबरला शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं सीजेपीने स्पष्ट केलं आहे.

इंडिया गेट या ठिकाणाहून हे आंदोलन सुरु होईल. नवी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असेल असं CJP ने स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा देणारे विद्यार्थी, नीट परीक्षा रद्द झाल्याने आत्महत्या केलेल्या मुलांचे आई वडील, २० जुलैला ज्यांनी ज्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या ते सगळेजण या शांतता मोर्चात सहभागी होणार आहेत असंही CJP ने स्पष्ट केलं आहे.