उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह टाकण्याच्या प्रकरणात एसआयटी चौकशीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. प्रदीपकुमार यादव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आम्ही जनहित याचिका म्हणून हे ऐकण्यास सहमती देत ​​नाही. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास संबंधित प्राधिकरणाकडे जाण्यास सांगितलं. याचिकाकर्ता प्रदीप यादव यांनी याचिकेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.

बिहार आणि उत्तर प्रदेशातील गंगा नदीत मृतदेह सापडल्याची घटना सुप्रीम कोर्टात पोहोचली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये बिहारमधील बक्सरमधील गंगा आणि यूपीमधील गाझीपूर आणि उन्नाव येथे मृतदेह सापडल्याच्या घटनांची चौकशी करण्याची मागणी विशेष तपास यंत्रणेमार्फत करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी सर्व मृतदेह बाहेर काढले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन केले पाहिजे, असेही म्हटले होते.

“प्रशासनाने शवविच्छेदन न करता खोटी कारवाई केली”

वकील प्रदीपकुमार यादव यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. प्रदीप व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “गंगा नदीत सुमारे १०० मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी ७० लोकांना बिहारमधील बक्सरमध्ये आणि ३० जणांना उत्तर प्रदेशात बाहेर काढण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने १०० गरीब लोकांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. यासह मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवावेत. याप्रकरणी प्रशासनाने शवविच्छेदन न करता खोटी कारवाई केली आहे, अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दोषींना चौकशी करण्यासाठी व शिक्षा देण्यासाठी एसआयटी स्थापन करावी.”

उत्तर प्रदेश: वाळू गेली वाहून.. गंगेच्या किनारी पुरलेले मृतदेह उघड्यावर

करोना काळत गंगेच्या किनारी करोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान, पुन्हा उत्तर प्रदेशातून एक वेदनादायी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर पुरलेले अनेक मृतदेह पाण्याची पातळी वाढल्याले पाण्यावर तरंगत आहेत. हे मृतदेह करोना रुग्णांचे असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. जशी-जशी पाण्याची पातळी वाढत आहे. तसे मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.