१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील कुख्यात डॉन अबू सालेमची सुटका याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अबू सालेमच्या वकिलाने हा युक्तिवाद केला होता की अबू सालेमने तुरुंगात २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता त्याची सुटका करण्यात यावी. अबू सालेमला ११ नोव्हेंबर २००५ ला ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्यावर न्यायलायने हे म्हटलं आहे की २५ वर्षांची शिक्षा माफी समाविष्ट करुन ते गणना करत आहेत का? तसंच ही सुटका याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
अबू सालेमच्या वतीने दाखल करण्यात आली सुटका याचिका
अबू सालेमच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सुटका याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये असा उल्लेख होता की अबू सालेमची तुरुंगातली २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता त्याची सुटका करण्यात यावी. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. अबू सालेमने समाजाचं काहीही भलं केलेलं नाही, तसंच समाजाचं भलं करण्यासाठी तू तुरुंगात नाहीस. तुला टाडाच्या अंतर्गत शिक्षा झाली आहे. अशी टिपण्णी करत न्यायालयाने अबू सालेमच्या याचिकेला केराची टोपली दाखवली. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
अबू सालेमला २००२ मध्ये अटक
अबू सालेमला २००२ मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणात २००२ मध्ये अटक झाली होती. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यानंतर पोर्तुगाल सरकारने एक अट घातली होती. ज्यात असं म्हटलं होतं की पोर्तुगालमध्ये मृत्यूदंडाची तरतूद नाही तसंच जास्तीत जास्त शिक्षा ही २५ वर्षांपर्यंत होऊ शकते. अबू सालेमला फाशी दिली जाणार नाही आणि त्याची कैद २५ वर्षांपेक्षा जास्त नसेल असं आश्वासन दिल्यानंतर त्याचं प्रत्यार्पण झालं होतं. २००५ मध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलं होतं. दरम्यान अबू सालेमची सुटका याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. २५ वर्षांची गणना शिक्षेत मिळणाऱ्या सवलतींना गृहीत धरुन करत आहात का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने अबू सालेमच्या वकिलांना केला. तसंच प्रत्यार्पण करारातील अटींनुसार सालेमला ज्या सवलती मिळाल्या त्याचा आणि मूळ शिक्षेचा ताळमेळ बसत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. तसंच त्याची याचिका फेटाळून लावली आणि कुठलीही तातडीची सवलत मिळणार नाही हेदेखील कोर्टाने स्पष्ट केलं.
१९९३ च्या साखळी स्फोटांनी मुंबई हादरली
१९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट हे भारताच्या इतिहासातील भयंकर साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक आहेत. हा एक सुनियोजित दहशतवादी हल्ला होता. १२ मार्च १९९३ या दिवशी मुंबईत दुपारी १.३० ते ३.४० या वेळेत हे स्फोट कऱण्यात आले. या दिवशी मुंबईतल्या १२ ठिकाणी एकामागोमाग आरडीएक्सने भरलेल्या कार बॉम्बचे स्फोट झाले. मुख्यतः शहरातील व्यस्त आणि महत्त्वाच्या भागांना टार्गेट करण्यात आळं होतं. ज्यामध्ये जव्हेरी बाजार, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडिया बिल्डिंग अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता.
