आपल्याविरुद्धचा राजद्रोहाचा खटला ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत पुढे ढकलावा, ही माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेली याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तथापि, मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.
मुशर्रफ यांचे वकील अहमद रझा कसुरी यांनी, मुशर्रफ यांच्याविरोधातील याचिका पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलावी अशी विनंती केली होती. ती न्या. जावेद ख्वाजा यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने फेटाळली. माजी लष्करशहा मुशर्रफ यांना अटक करावी, ही अर्जदारांची याचिका पीठाने फेटाळली. मुशर्रफ यांच्या कोणत्याही राजकीय कारवायांना स्थगिती देण्यात आलेली नसल्याचे पीठाने स्पष्ट केले आहे. न्यायालयात हजर राहावे लागल्यास मुशर्रफ ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचा प्रचार करू शकणार नाहीत, असे कसुरी यांनी न्यायालयास सांगितले. मुशर्रफ यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक हा खटला दाखल करण्यात आल्याचा दावा कसुरी यांनी केला. मात्र हा खटला चार वर्षांपासून सुरू असल्याचे न्या. ख्वाजा म्हणाले. पाकिस्तानात सध्या गंभीर पेचप्रसंगाची स्थिती असून, ती सोडविण्यासाठी मुशर्रफ मायदेशात आले आहेत आणि इंटरपोलनेही त्यांच्या अटकेला मज्जाव केला आहे, असा युक्तिवादही कसुरी यांनी केला.