Supreme Court Rejects Plea Delhi Police Student Protesters : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतर येथे उद्या कॉक्रोच जनता पार्टीने मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याकरता देशभरातील आंदोलक जंतर मंतरच्या दिशेने रवाना झाले असून काही ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली जात आहे. दरम्यान, या आंदोलकांवर कारवाई करण्याची मोकळीक द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशा प्रकरणांचा विचार करताना तरुण विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विचार करणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विद्यार्थ्यांसमोर संपूर्ण आयुष्य

भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटलं की, अनेक आंदोलक हे तरुण आहेत आणि त्यांना विनाकारण कोर्टाच्या दीर्घकालीन कामकाजात अडकवू नये. सरन्यायाधीशांनी म्हटले, “हे आपल्यासमोरील तरुण विद्यार्थी आणि आंदोलक आहेत. आपल्याला त्यांच्या पालकांचा विचार करावा लागेल, त्यांच्यासमोर त्यांचं संपूर्ण आयुष्य पडलं आहे. ते कोर्टाच्या सुनावणीत अडकले जाऊ नयेत.”

परंतु, न्यायालयाने हे स्पष्ट केले की, सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप असलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींचा यात समावेश नसेल.

एसआयआर प्रक्रियेतील गैरप्रकाराविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आहे. त्याकरता १० ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. याकरता देशपातळीवरील कारयकर्ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर, दिल्ली रेल्वे आणि मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दिल्लीकरांसह दिल्लीच्या बाहेरून येणाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून उद्या २ वाजता याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

रेल्वे विभागाचा नेमका निर्णय काय?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे विभागाने नवी दिल्ली व हझरत निझामुद्दीन या दिल्लीतील दोन महत्त्वाच्या स्थानकांवर जाणाऱ्या व या स्थानकांमधून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या शनिवारी १० ऑक्टोबर रोजी तब्बल १० तासांसाठी रद्द केल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार, शनिवारी पहाटे ४ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत ही रेल्वे वाहतूक बंद असणार आहे. वरीष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ही माहिती दिली.