Supreme Court Ruling 24 Hours Police Custody : पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे बंधनकारक आहे. मात्र, ही २४ तासांची मुदत अटकेची औपचारिक नोंद झाल्यापासून नव्हे, तर संबंधित व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर प्रत्यक्ष मर्यादा आणून तिला ताब्यात घेतल्याच्या क्षणापासून सुरू होते, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या व्यक्तीला २४ तासांपेक्षा अधिक काळ ताब्यात ठेवूनही दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले नाही तर तिची तात्काळ सुटका करावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. भारतीय संविधानातील अनुच्छेद २२(२) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितामधील कलम ५६ यांचा संदर्भ देत न्यायालयाने पोलिसांना अटक आणि ताबा यांच्यात कृत्रिम फरक करता येणार नसल्याचे नमूद केले.
अटकेची नोंद नव्हे, प्रत्यक्ष ताब्यापासून २४ तासांची गणना
संविधानाच्या अनुच्छेद २२(२) नुसार, अटक केलेल्या व्यक्तीला प्रवासासाठी लागणारा आवश्यक वेळ वगळता २४ तासांच्या आत जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांनी औपचारिक अटकेची नोंद उशिरा केली तर त्याआधीचा ताब्यातील कालावधी २४ तासांच्या गणनेतून वगळता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
“२४ तासांची मुदत केवळ औपचारिक अटकेपासून सुरू होते, असा दृष्टिकोन संविधानाच्या अनुच्छेद २२(२) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ५६ मधील घटनात्मक तरतुदींशी विसंगत आहे,” असे न्यायालयाने म्हटले.
२४ तासांची मर्यादा असली तरी ताबा अनिश्चित काळासाठी ठेवता येणार नाही
न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, २४ तासांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीही संबंधित व्यक्तीला अनावश्यक किंवा अवाजवी काळासाठी ताब्यात ठेवता येणार नाही. ताब्यात ठेवणाऱ्या यंत्रणेने परिस्थितीनुसार योग्य कालावधीची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला परवानगीयोग्य २४ तासांपेक्षा अधिक काळ दंडाधिकाऱ्यांसमोर हजर न करता ताब्यात ठेवल्यास तिची तात्काळ सुटका करावी लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
दंडाधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष ताब्याची वेळ नोंदवावी लागणार
सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष कोणत्या दिवशी आणि किती वाजता ताब्यात घेण्यात आले याची नोंद दंडाधिकाऱ्यांनी करावी. तसेच, प्रत्यक्ष ताब्यात घेतल्यापासून २४ तासांच्या आत त्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे की नाही याची पडताळणीही करावी, असे न्यायालयाने सांगितले.
