Supreme Court SC ST Constituency Rotation Petition Dismissed: “तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. सध्या आंदोलने आणि घोषणाबाजी करण्याचा चांगला हंगाम सुरू आहे, तुम्हीही ते करू शकता”, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांमध्ये चक्राकार पद्धतीने (रोटेशन) आरक्षण लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अशा शब्दांत मिश्कील टोला लगावला. हा विषय न्यायव्यवस्थेच्या नव्हे, तर संसदेच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश म्हणाले, “थोडं बळ एकवटून जनतेचा आवाज उठवा आणि कायदेमंडळाने यावर पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे, हे पटवून द्या.” हा निर्णय पूर्णपणे विधिमंडळाच्या अधिकारातील असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे निर्देश खंडपीठाने दिले.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राखीव मतदारसंघांच्या फेरबदलाला आव्हान देणारी ही याचिका फेटाळली. अनेक मतदारसंघ १९७२ पासून सातत्याने राखीव राहिले असून, फेरबदल न झाल्यामुळे ठराविक तीन-चार घराणीच सातत्याने निवडणुका लढवत आहेत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला होता.

याचिकाकर्त्याने २००८ च्या डिलिमिटेशन कमिशन शिफारशींचा दाखला देत राखीव मतदारसंघांचे रोटेशन करण्याची मागणी केली होती. अनेक दशकांपासून मतदारसंघ विशिष्ट घटकांसाठीच राखीव राहिल्यामुळे मतदारांच्या पर्यायांवर मर्यादा येतात आणि त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व कमी होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र खंडपीठाने हा विषय घटनात्मक संस्था आणि कायदेमंडळाचा असून कलम ३२ अंतर्गत यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

‘न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह बनू शकत नाही’

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले की, मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करणे हा विधिमंडळाचा विषय आहे. मतदारांसमोर पर्याय मर्यादित असले, तरी त्यांचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जात नाही. “पर्याय मर्यादित असू शकतात, पण मतदानाचा अधिकार शाबूत आहे,” असे ते म्हणाले.

कायद्यात उघडपणे मनमानीपणा आढळल्यास न्यायालय तरतूद रद्द करू शकते, परंतु आरक्षण फेरबदलाची नवी यंत्रणा तयार करण्यासाठी न्यायालय राज्यघटनेच्या तरतुदी नव्याने लिहू शकत नाही, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. “आम्ही संसदेचे तिसरे सभागृह म्हणून काम करू शकत नाही,” अशा स्पष्ट शब्दांत न्यायमूर्ती बागची यांनी न्यायालयाच्या मर्यादा अधोरेखित केल्या.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका का फेटाळली?

याचिकाकर्त्याने परिसीमन कायद्याच्या कलम ९(१)(क) ला आव्हान दिले होते. परिसीमन आयोगाच्या शिफारशींनंतरही SC/ST राखीव जागांचे रोटेशन केले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच या जागांचेही रोटेशन व्हावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, परिसीमन प्रक्रिया राबवताना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अपेक्षित असते; याचा अर्थ ती सातत्यपूर्ण फेरबदलाची प्रक्रिया आहे असा होत नाही. परिसीमन हा कायदेमंडळाचा विषय असून न्यायालय स्वतंत्रपणे असे आदेश देऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फेरबदलाचे नियमही विधिमंडळानेच तयार केले आहेत, असे न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले.