Supreme Court to Sharmila Tagore: भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या मुद्द्यावरून प्राणी मित्र आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास असलेले असे दोन गट समोरासमोर आलेले आहेत. गुरूवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्राणी मित्रांना थेट प्रश्न विचारले होते. आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाही खडे बोल सुनावले. तसेच त्या वास्तवापासून दूर असल्याचे सांगितले.
अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सार्वजनिक जागांवरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी काही सल्ले दिले होते. या सल्ल्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने झिडकारून लावले.
शर्मिला टागोर यांच्या वकिलांनी दिल्लीतील एम्स परिसरात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या एका ‘गोल्डी’ नावाच्या भटक्या कुत्र्याचे उदाहरण दिले. हा कुत्रा अनेक वर्षांपासून या परिसरात मिसळला असून सर्वांचा लाडका झाल्याचे वकिलांनी म्हटले. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे समर्थन करणे योग्य नाही. तसेच या कुत्र्याला काय ऑपरेशन थिएटरमध्येही नेले जात होते का? असाही प्रश्न खंडपीठाने विचारला.
टागोर यांच्या वकिलांनी पुढे म्हटले, “कुत्र्यांच्या आक्रमकतेची ओळख आणि त्यांच्या स्वभावाचा विचार करण्यासाठी आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा सल्ला देत आहोत. सामान्य आणि आक्रमक कुत्र्यांमध्ये फरक करायला हवा. जॉर्जिया आणि आर्मेनिया सारख्या देशांत रंगाचा कोड वापरून कुत्र्यांची विभागणी केली जाते. असा काही उपाय आपल्याकडे राबवला जावा, असेही वकिलांनी सांगितले.
तुम्हाला वास्तवाचे भान आहे का?
सर्वोच्च न्यायालयाने या सूचना फेटाळून लावल्या. जॉर्जिया आणि आर्मेनिया या देशांची लोकसंख्या किती आहे? जे सल्ले अमलात येऊ शकतात ते द्या. वास्तव काय आहे ते पाहा, असेही न्यायालयाने सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या शरीरावर अनेक जीव-जंतू असण्याची शक्यता आहे. जर असे कुत्रे रुग्णालयासारख्या परिसरात असतील तर त्यांच्यामुळे किती भीतीदायक परिस्थिती उद्भवू शकते? तुम्हाला वास्तवाचे भान आहे का?”
