नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याची आकडेवारी मतदानाच्या ४८ तासांच्या आत जाहीर करा, या मागणीच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

हेही वाचा >>> हरियाणात बसला आग, नऊ मृत्युमुखी

देशात लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून, सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची मतदान आकडेवारी अनुक्रमे ११ आणि ५ दिवसांनी जाहीर केली. त्यातही अनुक्रमे ७ आणि ५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यावर आक्षेप घेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतदानानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रशांत भूषण यांनी बाजू मांडत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.