Samay Raina News : इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात कायदेशीर कारवाईचा सामना करत असलेला कॉमेडियन समय रैना याच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने आता सौशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर अपंग आणि दुर्मिळ आजार असलेल्या व्यक्तींची थट्टा करण्यासाठी केल्याच्या प्रकरणात समय रैनासह ५ जणांना जणांना कठोर शब्दात सुनावले आहे. एका एनजीओजने त्यांच्या याचिकेत या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्सनी अपंग व्यक्ती आणि दुर्मिळ आजार असलेल्या लोकांची थट्टा केल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याच्यासह ५ सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्सना न्यायालयात उपस्थित राहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

सोशल मीडियावरील सेलिब्रिटींचा प्रभाव आणि त्यांची पोहच याबद्दल खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच आरोपांमध्ये वर्णन करण्यात आलेले वर्तन हे समाजातील आधीच असुरक्षित असलेल्या घटकांसाठी हानिकारक आणि त्यांचे खच्चीकरण करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने यासाठी तात्काळ जबाबदारी निश्चित करण्याची तसेच काहीतरी उपायकारक आणि दंडात्मक कारवाईची गरज देखील यावेळी अधोरेखित केली.

समय रैनाच्या अडचणीत भर

समय रैना त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट शोशी संबंधित वादामुळे आधीच चर्चेत आहे. रणवीर अलाहाबादियाने एका एपिसोडमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर त्याच्या या ऑनलाईन शोवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर समय रैना, अपूर्वी मुखिजा आणि आशिष चंचलानी या युट्यूबर्सविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाने त्याच्या शोमध्ये दृष्टिहीन व्यक्ती आणि अपंग लोकांबद्दल केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीबद्दल चांगलेच फटकारले. न्यायालयाने या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे खूपच व्यथित झाल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाई सुरू असताना अपूर्वी आणि रणवीर यांनी पुन्हा त्यांचे काम सुरू केले आहे, मात्र कॉमेडियन समय रैना मात्र अद्याप सार्वजनिक आयुष्यातून गायब असल्याचे पाहायला मिळत आहे.