त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचाराच्या वार्तांकनासाठी त्रिपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या दोन महिला पत्रकार आणि माध्यम समूह यांच्याविरुद्धच्या फौजदारी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.

हिंसाचाराबाबतच्या वृत्तांच्या संबंधात पोलिसांनी अलीकडेच पाचारण केलेल्या याच माध्यम समूहात सहयोगी संपादक असलेल्या तिसऱ्या पत्रकाराच्या विरोधातील कार्यवाहीलाही न्यायालयाने स्थगिती दिली.

आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले दोन एफआयआर रद्द करावेत यासाठी हा माध्यम समूह आणि पत्रकारांनी केलेल्या याचिकेवर चार आठवड्यांत बाजू मांडावी, अशी नोटीस धनंजय चंद्रचूड, सूर्य कांत व विक्रम नाथ या न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्रिपुरा सरकारच्या नावे काढली.

समृद्धी साकुनिया व स्वर्णा झा या दोन पत्रकार व त्यांचा माध्यम समूह थिओ कनेक्ट प्रा. लि. यांच्यासह या समूहातील सहयोगी संपादक आरती घार्गी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि घार्गी यांना पोलिसांनी अलीकडेच हिंसाचाराच्या संबंधात चौकशीसाठी बोलावले होते.