आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात असताना देशातून एक धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत १५ टक्के विद्यार्थी तणावाखाली असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे नऊ टक्के विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे विचार आल्याचे देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
टास्क फोर्सकडून सर्वेक्षण
यासंबधीत पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांची माहिती टास्क फोर्सकडून गोळा करण्यात आलीय. विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्नाचा भाग म्हणून सर्वेक्षण करण्यात आले. टास्क फोर्सचा अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी सादर केला जाण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येनंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
विविध समस्या, मुद्दे समोर
सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेल्या पथकाने या वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अहवाल सादर केला होता. यामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी अनुभवत असलेल्या विविध समस्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक भेदभाव, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात होणारा लैंगिक छळ, विधी आणि वैद्यकीय विद्यापीठातील स्त्री- पुरुष भेदभाव, शैक्षणिक सहकार्य, हॉस्टेल कर्फ्यु आणि मोरल पोलिसिंग यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच, नीट आणि जेईई परीक्षांमधील जात वैधता, प्रवेशावेळी जात आधारीत होणारा भेदभाव, ग्रेडिंग, भाषा आणि फॅक्लटीचे लक्ष या गोष्टीही समोर आल्या होत्या.
१५ टक्के विद्यार्थी तणावात
टास्क फोर्सने देशभरात केलेल्या सर्वेक्षणात २.४३ लाख विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली. यापैकी ६७ टक्के विद्यार्थी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील होते पैकी ३४ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये बाहेरुन आल्यासारखी भावना जाणवत होती. १५ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिने तणावपूर्ण असल्याचे सांगितले. नऊ टक्के विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे विचार मनात आल्याचे सांगितले. ५६ टक्के विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन गंभीर विषय व्यवस्थितपणे हताळत असल्याचे नमूद केले तर, ३२ टक्के विद्यार्थ्यांनी संस्थेत समुपदेशन सुविधा नसल्याचे सांगितले. या सर्वेक्षणात रोजगाराशी निगडीत चिंताही विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे समोर आले. या सर्वेक्षनानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मदत आणि आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी सुविधा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
