Supreme Court Two Child Norm Local Body Elections Disqualification: दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविणारे कायदे आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. भारतातील प्रजनन दर सातत्याने घटल्यामुळे अशा कायद्यांमागील लोकसंख्यावाढीची भीती आता उरलेली नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर दोन अपत्यांच्या निकषाला वैध ठरवणाऱ्या २००३ मधील ‘जावेद विरुद्ध हरियाणा राज्य’ या जुन्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठविले आहे.

महाराष्ट्रातील काकोडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंगला भीमराव यांना तिसऱ्या अपत्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अन्वये अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह व न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेत, त्यांची ही अपात्रता रद्द केली आहे.

भारताचा प्रजनन दर ३ वरून १.९ वर

२००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘जावेद विरुद्ध हरियाणा राज्य’ प्रकरणात दोन अपत्यांच्या निकषाला घटनात्मक वैधता दिली होती. त्यावेळी भारताचा एकूण प्रजनन दर ३ होता. मात्र, तो आता घसरून १.९ वर आला आहे. लोकसंख्येची एक पिढी स्वतःची जागा पुढील पिढीने भरून काढण्यासाठी आवश्यक असलेला प्रजनन दर २.१ मानला जातो. याला ‘रिप्लेसमेंट रेट’ किंवा प्रतिस्थापन दर म्हणतात. प्रजनन दर या पातळीच्या खाली गेल्यामुळे भविष्यात वृद्ध लोकसंख्या वाढणे आणि काम करण्यायोग्य वयोगटातील नागरिकांचे प्रमाण कमी होणे, अशा गंभीर बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली आहे.

दोन अपत्यांच्या निकषामुळे महिलांच्या अधिकारांवर परिणाम?

दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखल्यास नागरिकांचा एक वर्ग राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहू शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अपत्यांच्या संख्येचा आणि सार्वजनिक पद सांभाळण्याच्या क्षमतेचा थेट संबंध नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, अशा कायद्यांमुळे महिलांसमोर अपत्य जन्माला घालणे किंवा लोकशाहीत सहभाग घेणे यापैकी एकाची निवड करण्याची सक्ती होते, ज्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद २१ मधील प्रजनन स्वायत्ततेच्या अधिकारावर विपरीत परिणाम होतो, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली आहे.

कोणत्या राज्यांमध्ये दोन अपत्यांचा निकष लागू?

या सुनावणीदरम्यान समोर आले की, देशातील सात राज्यांनी दोन अपत्यांचा निकष रद्द केला आहे; तर १५ राज्यांमध्ये असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. मात्र, आसाम, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा व उत्तराखंड या राज्यांमध्ये हा निकष अजूनही कायम आहे, ज्यामुळे देशभरात या नियमाबाबत कोणतेही एकसमान धोरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील माजी सरपंचांच्या याचिकेमुळे प्रकरण चर्चेत

मंगला भीमराव यांच्याविरोधात तिसरे अपत्य झाल्याच्या कारणावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला. त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केले, मात्र ते फेटाळण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ५ ऑगस्ट २०२५ रोजी उच्च न्यायालयाने त्यांची अपात्रता कायम ठेवली होती. तिसऱ्या अपत्याच्या जन्मदाखल्यावर आई-वडिलांची दोघांचीही नावे असल्याने तो पुरावा नाकारता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाला मंगला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील निर्णय राखून ठेवताना २००३ मधील ‘जावेद’ निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का, यावर विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.