दोन सज्ञान व्यक्तींमधील परस्पर संमतीने निर्माण झालेल्या नात्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असतील, तर केवळ पुढे ते नाते तुटले म्हणून त्या संबंधांना नंतर बलात्कार ठरवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर सूड उगवण्यासाठी फौजदारी कायद्याचा वापर करण्याची वाढती प्रवृत्ती चिंताजनक असल्याचेही न्यायालयाने म्हटले. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. केरळमधील एका व्यक्तीला बलात्कार, फसवणूक आणि पहिला विवाह कायम असताना दुसरा विवाह केल्याच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले आहे.

‘नाते संपले म्हणून आधीचे संबंध बलात्कार ठरत नाहीत’

नाते सुरळीत सुरू असताना परस्पर संमतीने प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध, केवळ पुढे नात्यात दुरावा निर्माण झाला म्हणून बलात्कार ठरवता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुरुवातीपासूनच फसवणूक किंवा खोटेपणाच्या आधारावर संमती मिळवली गेली होती आणि नाते संपल्यानंतर पूर्वीच्या संबंधांबद्दल पश्चात्ताप झाला, या दोन वेगवेगळ्या परिस्थिती असल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

प्रत्येक बिघडलेल्या नात्याचे बलात्काराच्या गुन्ह्यात रूपांतर झाल्यास, भविष्यात आरोप होण्याच्या भीतीने व्यक्तींना नात्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्यच उरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. नाते संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे एखाद्या पुरुषाला फसवणूक किंवा कपटाचा दोषी ठरवता येईल का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

महिलांच्या शारीरिक स्वायत्ततेचे महत्त्वही अधोरेखित

बलात्कार हा गंभीर गुन्हा असून, प्रत्यक्ष लैंगिक हिंसा, जबरदस्ती किंवा फसवणुकीने संमती मिळवल्याच्या परिस्थितीतच त्याचा आरोप लागू होणे आवश्यक आहे. प्रत्येक बिघडलेल्या नात्याला बलात्काराचे स्वरूप दिल्यास या गुन्ह्याचे गांभीर्य कमी होऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले. मात्र याचवेळी महिलांच्या शारीरिक स्वायत्ततेचे आणि प्रतिष्ठेचे महत्त्वही न्यायालयाने अधोरेखित केले. बलात्काराच्या अनेक घटना नोंदवल्याच जात नाहीत. कुटुंबाची आणि स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेकदा पीडित महिलांना तक्रार न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जिथे लैंगिक अत्याचार आणि हिंसा झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते, तिथे अशा तक्रारींचा गांभीर्याने पाठपुरावा झाला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेशी विवाह करण्यापूर्वी आपल्या आधीच्या विवाहाची गोष्ट लपवून ठेवली होती आणि फसवणूक करून मिळवलेल्या संमतीच्या आधारे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयाने आरोपीची आरोपांतून मुक्तता करण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.