Supreme Court verdict husband silence not cruelty judgment: “पत्नीशी काही दिवस न बोलल्याच्या कारणावरून पतीला क्रूरतेच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले जाऊ शकत नाही,” असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने एकाची त्याच्या पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. “वैवाहिक जीवनात मतभेद आणि वाद होणे हा संसाराचाच एक भाग आहे, यामुळे दोघांमध्ये काही काळ संपर्क तुटू शकतो,” असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल केला रद्द
यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाने संबंधित पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. पती सलग १३ दिवस आपल्या पत्नीशी बोलला नाही या कारणावरुन पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, “कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, केवळ १३ दिवस संवाद न साधणे या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीत ‘क्रूरता’ या व्याख्येत बसवले जाऊ शकत नाही,” असे स्पष्ट केले.
न्यायालय काय म्हणाले?
या विशिष्ट प्रकरणात पती-पत्नीमध्ये कोणताही मोठा वाद किंवा भांडण झाल्याचे दिसून येत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने पुढे स्पष्ट केले. संबंधित कृत्याची तीव्रता किंवा गांभीर्य इतके भीषण होते का की ज्यामुळे एखाद्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त व्हावे लागले किंवा तिच्या मानसिक स्वास्थ्याला गंभीर धोका निर्माण झाला, याची न्यायालयाने तपासणी करणे आवश्यक होते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान,सासरचे लोक अतिरिक्त हुंड्यासाठी तिचा छळ करायचे, असा आरोप पीडितेच्या पालकांनी केला होता.
पतीची निर्दोष मुक्तता
फौजदारी खटल्यांमध्ये आरोप सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी फिर्यादी पक्षाची असते आणि त्यांनी हे आरोप निःशंकपणे सिद्ध करणे आवश्यक आहे. आरोपीवर स्वतःला निरपराध सिद्ध करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा कलम ४९८-अ सारखे गंभीर कलम लावले जाते, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केला. दरम्यान, निव्वळ १३ दिवस संवाद न होणे हा क्रूरतेचा गुन्हा ठरू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली.
