Supreme Court on Live-in: “दीर्घकाळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आणि ज्यांना मूलही आहे, अशा जोडप्यामध्ये महिला नंतर पुरुषावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही”, असे महत्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. “एखादी महिला एखाद्या स्वेच्छेने एखाद्या पुरुषाबरोबर बराच काळ राहते आणि त्यांच्या शारीरिक संबंधांतून अपत्य जन्माला येते. अशा परिस्थितीत लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केला हा तर्क लागू होत नाही”, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
एक जोडपे दीर्घकाळापासून एकत्र राहत होते. अनेक वर्षे नातेसंबंधात राहिल्यानंतर त्यांना एक आपत्य देखील झाले. मात्र, यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागला. महिलेने पुरुष जोडीदारावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा नोंद केला. सर्वोच्च न्यायालयाने या संबधित सुनावणी देताना खटला रद्द करताना, दीर्घकाळ नात्यात राहून, मूल झाल्यानंतर महिला अचानक पुरुषावर बलात्काराचा आरोप करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालय काय म्हणाले?
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांनी याप्रकरणी निकाल दिला. “जोडपे दीर्घकाळापासून एकत्र राहत होते. दोघांमध्ये दीर्घकाळापासून शारीरिक संबंध होते आणि ते परस्पर संमतीने होते. पुरुष जोडीदाराने लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पण, पुराव्यांवरुन दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र होते असे दिसते”, असे न्यायालयाने म्हटले आहे. वैयक्तिक भांडणातून किंवा सूड घेण्यासाठी म्हणून फौजदारी कायद्याचा आधार घेणे अयोग्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कायद्याच्या गैरवापराची शक्यता
“महिला संमतीनेच दीर्घकाळ या नात्यात होती असे दिसून येते. लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये बलात्काराच्या गंभीर कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते”, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. “भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी ‘संमतीचा अभाव’ असणे आवश्यक आहे. जर एखादी सुशिक्षित महिला स्वतःच्या इच्छेने नात्यात राहते, तर लग्नाचे आश्वासन पाळले गेले नाही या एकाच कारणावरून त्या नात्याला बलात्काराचे स्वरूप देता येणार नाही”, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
