Supreme Court on Divorce Husband Wife Duties: “नवऱ्यानेही स्वयंपाक करणे, साफसफाई आणि कपडे धुणे आणि इतर घरकामात पत्नीची मदत केली पाहिजे. तुम्ही मोलकरणीशी नाही तर जोडीदाराशी लग्न केले आहे”, सध्याच्या विवाह संस्थेतील अडचणींबाबत सर्वोच्च न्यायालयाने थेट टिप्पणी व्यक्त केली आहे. घरकामावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर या याचिकेवर सुनावणी पार पडली. पतीने क्रूरतेच्या मुद्द्यावर पत्नीपासून घटस्फोट मागितला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने पतीला सुनावले.

आता वेळ बदलली

न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावर खंडपीठाने मौखिक टिप्पण्या केल्या. खंडपीठाने म्हटले, “आता वेळ बदलली आहे. आजच्या काळात पतीनेही घरकामात पत्नीची मदत करायला हवी. जेवण बनवणे, स्वच्छता राखणे, घरातील प्रत्येक कामात पतीने मदत केली पाहिजे. कारण तुम्ही मोलकरणीशी नाही तर एका जोडीदाराशी लग्न केले आहे.”

जेवण बनवले नाही, ही मानसिक क्रूरता आहे का?

सध्या युगात बदलत्या सामाजिक नियमांचा संदर्भ देत खंडपीठाने पतीच्या वकिलांना प्रश्न विचारला की, पतीने दिलेली कारणे खरोखरच क्रूरता ठरतात का? यावर याचिकाकर्त्या पतीच्या वकिलाने सांगितले की, पत्नी पतीबरोबर योग्यप्रकारे वागत नव्हती. ती स्वयंपाक करत नव्हती. यावर न्यायाधीश विक्रम नाथ यांनी म्हटले की, पतीलाही घरकामात मदत करायला हवी. स्वयंपाक केला नाही, हे क्रूरतेचे कारण असू शकत नाही.

घटस्फोटाचे प्रकरण काय?

पतीच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याचे मे २०१७ मध्ये लग्न झाले. २०१९ पासून ते वेगळे राहत आहेत. पत्नी स्वयंपाक आणि इतर घरकाम करत नसल्याचा आरोप करत पतीने घटस्फोटाची मागणी केली. दरम्यान पती-पत्नीमध्ये मध्यस्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरले, अशीही माहिती न्यायालयाला देण्यात आली. दोघेही सरकारी शाळेत नोकरी करत असून त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सारख्याच असल्याचे दिसून आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता पुढील सुनावणीदरम्यान पती-पत्नीशी व्यक्तिशः चर्चा करण्यासाठी त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांना प्रत्यक्ष बोलवा, असे खंडपीठाने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २७ एप्रिल रोजी होणार आहे.