नवी दिल्ली : अंपंगासाठी असलेल्या अनारक्षित रिक्त पदे ही सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी खुली असून गुणवत्ता हा निर्णायक घटक असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. कोणत्याही सामाजिक किंवा विशेष प्रवर्गातील पात्र उमेदवारांची या पदांवर नियुक्ती करता येईल, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.
याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करताना न्या. संजय कारोल आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले की, अनारक्षित श्रेणी हा स्वतंत्र सामाजिक प्रवर्ग नाही तर सर्वांसाठी खुली आहे. केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहे या कारणामुळे इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) यासारख्या आरक्षित प्रवर्गांत मोडणार्या अधिक गुणवत्ताधारक उमेदवाराची अपंगांसाठी असलेल्या अनारक्षित पदावर नियुक्ती नाकारता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
निकालपत्र लिहिणारे न्यायाधीश न्या. सिंह म्हणाले, ‘‘आरक्षण कायद्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, अनारक्षित किंवा खुला प्रवर्ग ‘एससी’, ‘एसटी’ किंवा ‘ओबीसीं’सारख्या सामाजिक अथवा जातीय प्रवर्गाचा संदर्भ देत नाही. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, अनारक्षित किंवा खुल्या प्रवर्गातील कोणत्याही पदाचा कोणत्याही विशिष्ट सामाजिक प्रवर्गाशी संबंध नाही, हा प्रवर्ग सर्व उमेदवारांसाठी खुला आहे. मग तो कोणत्याही सामाजिक प्रवर्गाचा असो किंवा नसो.’’
