पीटीआय, नवी दिल्ली

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरील आदेशावर माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी टीका केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, गांधी यांची वक्तव्ये हा न्यायालयाचा अवमान आहे, अशी टिप्पणी न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने केली. त्याचवेळी, न्यायालय उदारता दाखवून मनेका गांधी यांच्याविरोधात अवमान कारवाई सुरू करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनेका गांधी यांच्यावतीने हजर असलेले ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांना प्रश्न विचारताना न्यायाधीश म्हणाले, “थोड्या वेळापूर्वी तुम्ही न्यायालयाला सावध राहण्याचा सल्ला देत होतात. तुमच्या आशिलाने नेमक्या कोणत्या प्रकारच्या टिप्पणी केल्या आहेत, हे तुम्ही पाहिले आहे का? त्यांचा पॉडकास्ट ऐकला आहे का?”

“त्यांनी कोणताही विचार न करता सर्वांवरच टीका केली आहे. त्यांची देहबोली पाहिली आहे का? त्या काय आणि कशा पद्धतीने बोलतात. तुमच्या आशिलाने न्यायालयाचा अवमान केला आहे. न्यायालयाच्या उदारतेमुळे आम्ही त्याची दखल घेत नाही,” असे खंडपीठाने सांगितले. यावर रामचंद्रन म्हणाले की, हे अवमानाचे प्रकरण नाही आणि राजकारणी अनेकदा वेगवेगळी वक्तव्ये करत असतात.