पवार कुटुंबीयांवरच्या टीकेमुळेच मोदींना प्रसिद्धी मिळाली,सुप्रिया सुळेंचा टोला

भाजपाकडे मुद्देच नसल्याने ते जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचीही टीका सुप्रिया सुळेंनी केली

पवार कुटुंबीयांवर पंतप्रधान टीका करत आहेत त्याचमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात आलं की पवार कुटुंबीयांवर टीका केल्यावर वर्तमानपत्रात त्याची हेडलाईन होते. मोदींनी हे सिद्ध करून दाखवले आहे की महाराष्ट्रात आल्यावर पवार कुटुंबीयांवर टीका केल्यानेच प्रसिद्धी मिळते असंही त्या म्हटल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका केली. तसंच मी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर आभारही मानते असंही त्या उपरोधाने म्हटल्या आहेत.

राज ठाकरे हे धायरीमध्ये सभा घेणार आहेत याबद्दल विचारले असता, बारामतीत यायला सगळ्यांनाच आवडते. राज ठाकरे धायरीमध्ये सभा घेणार आहेत त्यामुळे अतिथी देवो भव अशी आमची भूमिका आहे असंही त्या म्हटल्या. भाजपा आणि शिवसेनेविरोधात राज ठाकरे सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आहे त्याचमुळे भाजपाकडून राज ठाकरेंना लक्ष्य केले जाते आहे असंही त्या म्हटल्या.

पंतप्रधान काय किंवा इतर भाजपाचे नेते काय दिलेल्या आश्वासनांबाबत, वचनांबाबत विकासकामांबाबत काहीही बोलत नाहीत. त्यांच्याकडून फक्त व्यक्तिगत टीका केली जाते आहे असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला. पार्थ पवार यांच्याबाबत विचारले असता, आपण पार्थ पवारांसाठी मावळमध्ये जाऊन प्रचारसभा घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रचार करत असताना आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कारण सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या मनात रोष आहे. याचा फायदा आम्हाला निवडणुकीत नक्कीच होईल असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

तुम्हालाही भाजपाने ऑफर दिली का? असा प्रश्न विचारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आणि इतर कोणी असो मला कोणीही कसलीही ऑफर दिलेली नाही. ऑफर द्यायला मी काही साबण नाही असंही त्या विनोदाने म्हटल्या. भाजपाकडे मुद्दे नसल्याने ते जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Supriya sule criticized pm modi and bjp in press conference

ताज्या बातम्या