Supriya Sule on Indian Delegation on Operation Sindoor : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. परिणामी पाकिस्तानचा खरा चेहराजगासमोर आणण्यासाठी, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्रसरकारने सर्वपक्षीय खासदारांची व निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची काही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली होती. या शिष्टमंडळांनी अनेक देशांमध्ये जाऊन तिथली प्रसारमाध्यमे, बुद्धीजिवी लोक व सराकरसमोर भारताची बाजू मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील एका शिष्टमंडळाबरोबर कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया व इजिप्तचा दौरा करून परतल्या आहेत.

दौरा आटपून परतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, आम्ही भारताच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया व इजिप्त या चार देशांना आम्ही भेट दिली. त्यांच्या नेतृत्वांनी आवर्जून सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतासोबत ठामपणे उभे आहोत.

भारताकडून जगाला खूप अपेक्षा असल्याने अनेक देशांमधील नेत्यांनी सांगितलं : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, परदेशातील प्रत्येक बैठकीत स्थानिक नेत्यांकडून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या सर्व नेत्यांमुळे निर्माण झालेला ७५ ते ७६ वर्षांचा प्रवास सातत्याने उल्लेखला गेला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. तिथल्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आपण दहशतवादाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. मात्र, त्याचवेळी शांततेच्या मार्गानेही वाटचाल करावी, ही भावना प्रत्येक देशाने वारंवार व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार म्हणाल्या, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण कारवाई केली, ती एक प्रतिक्रिया म्हणून अपेक्षित होतीच. ‘तुमच्यावर अन्याय झाला, त्याला उत्तर म्हणून कारवाई केली, हे योग्यच. परंतु, त्यानंतर संयम आणि समजूतदारपणा दाखवून तुम्ही तणाव कमी केला, याचे आम्हाला कौतुक वाटते,’ असे तिथल्या प्रतिनिधिंनी आवर्जून सांगितले. आम्ही भारतीय आहोत आणि पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो आमच्या भारतावर अन्याय होता. ‘तुम्ही आमच्यासोबत ठामपणे उभे रहा, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आपण एकजुटीने जगासाठी एकत्र काम करू या,’ ही भावना आमच्यात सातत्याने होती.

“जगभरातील अनेक देशांमध्ये महात्मा गांधींचा प्रभाव जाणवला”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं त्या देशांशी असलेलं नातं, इंदिरा गांधींचं नेतृत्व, डॉ. मनमोहन सिंग यांचं परराष्ट्र धोरणातील महत्त्वपूर्ण योगदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीच्या पुढच्या टप्प्यापर्यंत नेलेला प्रवास यांचा प्रत्येक देशाने आवर्जून उल्लेख केला. तसेच, या चारही देशांमध्ये महात्मा गांधींचा मोठा प्रभाव असल्याचं प्रकर्षाने जाणवलं. मी या दौऱ्यावर माझ्या देशासाठी शिष्टमंडळाच्या माध्यमातून गेले होते. मी कोणत्याही सरकारसाठी नव्हते, तर एक भारतीय म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार म्हणाल्या, केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक दिवसांपासून ही मागणी केली होती. आता ती मागणी पूर्ण होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता ही आकडेवारी बाहेर येईल.