पीटीआय, नवी दिल्ली : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची कालमर्यादित चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
जर राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्याला न्याय मिळत नसेल तर इतरांचे काय, असा प्रश्न लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार सुळे यांनी केला. तसेच याप्रकरणी ‘एफआयआर’ दाखल न केल्याबद्दल राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली.
२८ जानेवारी रोजी बारामती येथील विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी सांगितले, की या अपघातासंदर्भात त्यांच्या तक्रारीवर कथित निष्काळजीबद्दल राज्य पोलिसांना ‘एफआयआर’ नोंदवण्यात अपयश आल्याने, त्यांनी बंगळूरुमध्ये ‘झिरो एफआयआर’ दाखल केला. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी या अपघाताची कालमर्यादेत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लोकसभेत केली.
दरम्यान, राज्याची प्रतिमा मलीन करण्यासाठीच रोहित पवार यांनी बंगळूरुमध्ये अपघातासंदर्भात ‘झिरो एफआयआर’ दाखल केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली होती.
